कामाला जाऊन घर, मुलं सांभाळतात त्या महिलांचं कौतुक आहेच. पण ज्या महिला 24 तास घरात असतात आणि घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी सकाळच्या चहापासून ते रात्रीचे अंथरून टाकण्यापर्यंत सर्वच कामं पाहतात म्हणजेच इंग्रजी भाषेत त्यांना आपण हाऊस वाइफ म्हणतो त्यांचे देखील तितकेच कौतुक झाले पाहिजे.
महिला हा असा विषय आहे, ज्यावर आपण सर्व कितीही बोललो तरी फायदा हा तात्पुरताच होतो. आज प्रत्येक महिला ही प्रत्येक स्तरावर जाऊन पोहचलेली आहे. घर, मुलं सांभाळून त्यांनी प्रगती देखील केली आहे. हे सर्वांना दिसत आहे आणि कळत देखील आहे. परंतु तरीही अनेक महिला आहेत, ज्यांना कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे त्यांची स्वप्न पूर्ण करता येत नाहीत.
हाऊस वाइफचेही कौतुक झाले पाहिजे
गेल्या वर्षभरापासून सर्वच मंडळी ही घरात बसून आहेत. त्यामुळे महिलांच्या कामांमध्ये अजून वाढ होताना दिसत आहे. घरात असणार्या प्रत्येक व्यक्तीसाठी सकाळच्या चहापासून ते रात्रीचे अंथरून टाकण्यापर्यंत सर्वच महिलांना बघावे लागत आहे. आणि महिला हे सर्व बघत देखील आहेत. या संपूर्ण काळामध्ये घरात 24 तास असणारी आपली आई किंवा बायको हिचा मात्र कोणीच विचार केला नाही. आधी घरातील मंडळी कामानिमित्त बाहेर असायची त्यामुळे त्यांना आराम करायला तरी मिळत होता. परंतु लॉकडाऊनमुळे त्या आरामाचा देखील हराम झाला आहे. ज्या महिला कामाला जाऊन घर, मुलं सांभाळतात त्यांचे तर कौतुक आहेच. पण ज्या सारख्याच 24 तास घरात असतात, म्हणजेच आपल्या इंग्रजी भाषेत त्यांना आपण हाऊस वाइफ हा शब्द दिला आहे त्यांचे देखील तितकेच कौतुक केले पाहिजे.
बायकोला काम करून देण्यात कमीपणा वाटतो
आपल्या भारतामध्ये अशी एकही महिला नाही जिला स्वतःच्या पायावर उभं राहावं असं वाटत नसेल. अनेक अडचणींमुळे त्यांना त्यांची स्वप्नं पूर्ण करता आली नसतील. आपण आपल्या घरातील आपली आई किंवा बायको यांना कधी समजून घेतलं आहे का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा… आपल्या आईला समजून घेणं, तिची काळजी घेणं हे जसं तुमचं कर्तव्य आहे, तेवढंच बायकोला देखील तुम्ही समजून घेतलं पाहिजे. माझ्या ओळखीत अशा अनेक महिला आहेत, ज्यांना परिस्थितीमुळे जास्त शिकता नाही आलं. आई - वडिलांची परिस्थिती नसल्यामुळे अनेक मुलींनी लवकर शिक्षण सोडून दिलं. या मुली मग लग्न झालं की घर आणि मूल यात अडकून बसतात. अशा वेळी त्या महिलांच्या नवर्याने त्यांना साथ देणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य आहे. पण आपल्या देशात अजूनही या कर्तव्याला शेवटचं कर्तव्य मानलं जातं किंवा काहींच्या कर्तव्याच्या यादीमध्ये हे कर्तव्य नसतंच.
प्रत्येक महिलेने स्वाभिमानी असले पाहिजे
अजूनही अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की पुरुषांना लग्नानंतर महिलांच्या शिक्षणाची गरज वाटत नाही. आपल्या बायकोला काम करून देण्यात देखील अनेकांना कमीपणा वाटतो. तिचे शिक्षण नाही, ती 10 वी पास नाही, तिला काम करायला जमेल का ? असे अनेक प्रश्न त्यांना पडतात. अनेक पुरुष मंडळी असे देखील म्हणतात, ’ती बाहेर गेली, बाहेरचं काम बघितलं की घरात कोण बघणार ? किंवा मग सर्वात मोठा आणि इमोशनल ब्लॅकमेल करणारा मुद्दा म्हणजे… आमच्या घरात तुला काही कमी आहे का? घरात कमी असणे किंवा नसणे हा मुद्दा मुळात कधीच मध्ये येत नाही. कारण प्रत्येक महिलेने स्वाभिमानी झालेच पाहिजे आणि शिक्षण म्हणाल तर कोणतेच काम हे छोटे किंवा मोठे नसते. आणि कोणतेही शिक्षण हे कधीच वाया जात नाही…
स्त्रीला प्रोत्साहन द्या अन स्वावलंबी बनवा
प्रत्येक महिला ही लता मंगेशकर, सिंधुताई सपकाळ, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, सुनीता विल्यम्स, कल्पना चावला नाही होऊ शकत परंतु, त्यांचा आदर्श घेऊन नक्कीच पुढे जाऊ शकते. स्त्री शिक्षणासाठी झटणार्या सावित्रीबाई फुले यांच्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले यांची साथ होती. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळराव देशमुख यांना डॉक्टर बनविण्याच्या पाठीमागे त्यांचे पती गोपाळराव देशमुख यांचादेखील हातभार महत्त्वाचा होता. मी तर म्हणेन, आपल्या आईला, पत्नीला किंवा घरात असणार्या इतर स्त्रीला प्रोत्साहन द्या आणि स्वावलंबी बनवा. एखाद्या स्त्रीने जर ठरवले तर ती कोणतेही काम नक्कीच करू शकते. असा सकारात्मक विचार नेहमी बाळगा.