ज्येष्ठ अभिनेते व नवनिर्वाचित खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची लेक आणि लोकप्रिय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लग्न करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. ३७ वर्षीय सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता झहीर इक्बालशी २३ जून रोजी मुंबईत लग्न करणार आहे. सोनाक्षी आणि झहीर बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत पण एकमेकांबद्दल किंवा नात्याबद्दल ते जाहीरपणे कधीही बोलले नाही.
‘इंडिया टुडे’ने सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांचं लग्न २३ जूनला होणार असल्याचं वृत्त दिलं आहे. त्यांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या लग्नात त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त ‘हीरामंडी’च्या सर्व कलाकारांना लग्नासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.
सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका खास पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे. पत्रिकेच्या पहिल्या पानावर ‘अफवा खऱ्या आहेत’ असं लिहिलं आहे. तसेच सर्व पाहुण्यांना फॉर्मल्समध्ये लग्नात येण्यास सांगितलं आहे. या दोघांच्या लग्नाचा सोहळा मुंबईतील बास्टियन येथे होणार आहे, अशी माहितीही समोर आली आहे.
सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल दोघेही अनेक इव्हेंट्सना एकत्र हजेरी लावतात. बऱ्याचदा त्यांचे फोटोशूटही चर्चेत असतात. सोनाक्षी व झहीर सोबत व्हेकेशनसाठी जात असतात. ते दोघेही एकमेकांचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत असतात. २ जून रोजी सोनाक्षी सिन्हाचा वाढदिवस होता. सोनाक्षीच्या वाढदिवसाच्या दिवशी झहीरने तिच्याबरोबरचे चार फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होता. सोनाक्षीने त्याच्या या पोस्टवर कमेंटही केली होती.
सोनाक्षी व झहीर यांनी चित्रपटात एकत्र काम केलं आहे. दोन वर्षांपूर्वी २०२२ मध्ये आलेल्या ‘डबल एक्सएल’ या चित्रपटात सोनाक्षी व झहीर झळकले होते. या चित्रपटानंतरच दोघांच्या नात्याची चर्चा होऊ लागली. मात्र सोनाक्षी किंवा झहीरने कधीच जाहीरपणे नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली नाही. दोघेही एकमेकांसाठी वाढदिवसाला पोस्ट करतात व इव्हेंट्सला हजेरी लावतात. आता ते २३ जून रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप झहीर किंवा सोनाक्षीने किंवा त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही.