बॉलिवूड इंडस्ट्रीची ‘चांदनी’ म्हणजेच श्रीदेवीने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये हक्काचे स्थान मिळवले होते. ८०-९०च्या दशकात या अभिनेत्रीने आपल्या सौंदर्याने लोकांना वेड लावले होते. श्रीदेवीने १९६७मध्ये आलेल्या 'कंधन करुणाई' या तमिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अनेक तामिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, श्रीदेवीने १९७५ मध्ये 'जुली' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटामुळे श्रीदेवीला देशभरात ओळख मिळाली. तब्बल ५० वर्षांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट देणारी श्रीदेवी तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली.
फारच कमी लोकांना हे माहीत आहे की, श्रीदेवी चित्रपट निर्माता बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना यांची खूप चांगली मैत्रीण होती. मोना कपूर यांनी या मैत्रीमुळेच श्रीदेवीला स्ट्रगलच्या काळात आपल्या घरात राहण्यासाठी आसरा दिला होता. त्या काळात अभिनेत्री श्रीदेवी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना डेट करत होती.
एक काळ असा होता, जेव्हा मोना कपूर यांच्या घरात राहणारी श्रीदेवी बोनी कपूर यांना राखी बांधायची. तेव्हा श्रीदेवीचे मिथुन चक्रवर्ती यांच्यावर खूप प्रेम होते. पण, मिथुन चक्रवर्ती यांना श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचे अफेयर असल्याचा संशय होता. मिथुन यांनी आपल्या प्रेमावर विश्वास ठेवावा म्हणून श्रीदेवी हिने बोनी कपूर यांच्या हातावर राखी बांधली होती. बोनी कपूर यांच्या पत्नी मोना यांनीच एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. एकत्र काम करत असतानाच श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी सगळ्यांपासून लपून एकमेकांसोबत वेळ घालवायला सुरुवात केली. मात्र, मोना कपूर यांनी या दोघांवर कधीच संशय घेतला नाही. त्यांना मात्र हेच वाटत होते की, श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यात केवळ बहीण-भावाचे नाते आहे. पण, त्यांच्या नजरेआड वेगळंच चित्र होतं.
'मिस्टर इंडिया' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान निर्माता बोनी कपूर यांनी श्रीदेवीवरील आपले प्रेम व्यक्त केले होते. श्रीदेवीने एका मुलाखतीत म्हटले होते की, जेव्हा ती बोनी कपूर यांना फार जवळून ओळखू लागली, तेव्हा ती देखील त्यांच्या प्रेमात पडली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवी लग्नाआधीच गरोदर झाली होती, त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.