Close

यश तुमच्या हातात ! (Success In Your Hands!)

यशाची विशिष्ट अशी व्याख्या करणं जसं शक्य नाही, त्याचप्रमाणे ते संपादन करण्यासाठी विशिष्ट असा मंत्र सांगणंही कठीण आहे. पण म्हणून यशस्वी होणं अशक्यप्राय नाही. प्रत्येक जण यशाचं शिखर गाठू शकतं… ते तुमच्या हातात नक्कीच आहे.


करिअर… या शब्दाला आता कमालीचं महत्त्व प्राप्त झालंय. करिअरची संकल्पनाच बदलली आहे… ते प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनलं आहे. म्हणूनच करिअर घडवणं… त्यात यशस्वी होणं यासाठीची स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अर्थात, कालानुरूप झालेला हा बदल काही गैर नाही. मात्र या स्पर्धेत टिकून राहणं, यश प्राप्त करणं अनेकांना कठीण वाटू लागलं आहे. परिस्थितीच अशी आहे
की, निराशा येणं स्वाभाविक आहे. पण निराशेने प्रश्‍न सुटत नाहीत… ते अधिकाधिक जटिल होत जातात. तेव्हा शांतपणे डोळे अलगद मिटा, दीर्घ श्‍वास घ्या आणि म्हणा ‘माझं यश माझ्याच हातात आहे’… आणि बघा परिस्थिती कशी तुमच्या बाजूने होते ते. हो, पण त्या जोडीला तुम्हाला काही गोष्टी आत्मसात करण्याची गरज आहे.

संवाद कौशल्य समृद्ध करा
करिअर कोणत्याही क्षेत्रातलं असलं, तरी संवाद कौशल्य अतिशय महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. इतरांशी योग्य प्रकारे सुसंवाद साधता यायला हवा. म्हणूनच आपलं संवाद कौशल्य प्रभावी करण्यावर भर द्या.

वेळेचं योग्य नियोजन करा
सर्वप्रथम वेळेचा आदर करायला शिका, म्हणजे तो तुमचा आदर करेल. दिवसात 24 तासच राहणार आहेत. तेव्हा या 24 तासांचं नियोजन तुम्ही कसं करता, यावर तुमचं यश, तुमची प्रगती अवलंबून राहील. वेळेचा सदुपयोग करायला शिका.

पर्यायही ठेवा
पर्याय असले की निवडीला अधिक चांगला वाव मिळतो, असं म्हणतात. करिअरच्या बाबतीतही हा नियम पाळण्यास हरकत नाही. आपल्याकडे करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, याकडेही डोळस लक्ष असू द्या. मग या विविध पर्यायांमधील आपल्या आवडीचं करिअर निवडा.

ध्येय निश्‍चित करा
आयुष्यापासून आपल्याला काय अपेक्षित आहे? आपल्याला काय करायचंय? हे आपणच ठरवायला हवं. इतरांना भलेही काहीही वाटेल, त्यांच्या आपल्याकडून अनेक अपेक्षा असतील वा नसतीलही. पण आपल्याला काय अपेक्षित आहे, ते अचूक ओळखता यायला हवं.

ध्येयानुसार स्वतःला प्रशिक्षित करा
एकदा कोणतं करिअर करायचं ते निश्‍चित झालं की, मग त्या अनुषंगाने आपल्यामध्ये कोणते गुण, कोणते कौशल्य असणे आवश्यक आहे, त्याची माहिती करून घ्या. त्यानुसार स्वतःला अधिकाधिक प्रशिक्षित करा.

अपयशाने निराश होऊ नका
प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे येतच असतात. अपयशाकडे यश संपादन करण्यासाठीची एक संधी म्हणून पाहा. आपला दृष्टिकोन कायम सकारात्मक ठेवा. चांगला विचार कराल, तेव्हाच चांगलं घडेल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे अपयशाने खचून न जाता, अपयशाची कारणं शोधा आणि त्यावर मात करण्यासाठी योग्य पावलं उचला.

नावीन्याचा ध्यास असू द्या
आपल्या क्षेत्रात होणार्‍या नवनव्या घडामोडींविषयी अपडेट राहा. नवे तंत्रज्ञान शिकून घ्या आणि त्याचा आपल्या कामात सुयोग्य वापर करा. अशा नावीन्यामुळे कामातही उत्साह राहील.

अहंभाव बाळगू नका
कामाच्या ठिकाणी अहंभावाला थोडी बगल दिलेलीच बरी. कारण यामुळे आपलंच नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. अर्थात, एखादी गोष्ट जमत नसेल किंवा काही अडचण येत असतील, तर कुणाची तरी मदत अवश्य घ्या. वयानुसार किंवा अनुभवानुसार लहान-मोठ्या कोणाचीही मदत घेण्यासाठी अहंभाव मध्ये येऊ देऊ नका.

बदलांना घाबरू नका
बदल हे जिवंतपणाचं लक्षण आहेत, असं म्हणतात. त्यामुळे या बदलांना घाबरू नका. त्यांचा स्वीकार करा. परिस्थितीनुरूप आपल्या व्यक्तिमत्त्वातही बदल करता यायला हवा. तसेच आपण निवडलेलं हे क्षेत्र आपल्यासाठी योग्य नाही किंवा आपण यापेक्षा काही वेगळं करू शकतो, असं वारंवार वाटत असेल तर समुपदेशकांचा सल्ला घ्यायलाही हरकत नाही. यानुसार क्षेत्र बदलावं, असा निष्कर्ष निघत असेल, तर तसं करण्यासही हरकत नाही. मात्र तत्पूर्वी विचार अवश्य करा. कुणी तरी सांगतं आहे, म्हणून हा बदल करू नका किंवा कोण काय म्हणेल असा विचार करून बदल करण्यास घाबरू नका.
प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा… मग समस्या आणि त्या समस्यांचे निरसन करण्याचे उपाय कसे काय समान असतील? म्हणूनच स्वतःच्या आयुष्याकडे इतरांच्या चष्म्यातून पाहण्यापेक्षा, स्वतःच्या… त्याही सकारात्मक नजरेतून पाहा. प्रत्येक व्यक्तीमध्ये यश मिळविण्यासाठी आवश्यक असे सुप्त गुण असतात, पण गरज असते ती त्या सुप्त गुणांचा विकास करण्याची.

Share this article