Close

प्रसिद्ध गायक, संगीतकार सुधीर फडके यांच्यावर ‘बायोपिक’! (Sudhir Phadke Biopic)

आजवर अनेक बायोपिक बनवण्यात आले. अशातच आता सर्वांचे लाडके बाबूजी म्हणजेच गायक, संगीतकार सुधीर फडके यांच्यावर बायोपिक बनवला जात आहे. या बायोपिकचे नाव स्वरगंधर्व सुधीर फडके असे आहे. या चित्रपटाच्या मुहूर्ताला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते त्या मुहूर्ताचा प्रारंभ करण्यात आला. सुधीर फडके हे मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध संगीतकार आणि लोकप्रिय गायक होते.

सुधीर फडके यांचा जन्म कोल्हापूरचा. शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण त्यांनी वामनराव पाध्ये यांच्याकडे घेतले होते. १९४१ साली एचएमव्ही या संगीत संस्थेत त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर १९४६ साली प्रभातच्या चित्र संस्थेत संगीत दिग्दर्शक म्हणून ते रुजू झाले. शिस्तप्रिय आणि तितकेच हळवे आणि प्रेमळ स्वभावाच्या बाबूजींनी सगळ्यांना आपलेसे केले. दुसऱ्यांच्या कलेला दाद देणं, शाबासकी देणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. कट्टर देशभक्त, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवक, सावरकरांचे निस्सीम भक्त, कोयना भूकंपात मदतनिधी गोळा करणं अशा विविध क्षेत्रात ते सक्रिय होते.

सुधीर फडके यांना स्वरगंधर्व म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. त्यांचे जन्मनाव राम फडके असे होते. त्यानंतर त्यांनी नाव बदलून सुधीर असे ठेवले. मराठी संगीत विश्वामध्ये त्यांना बाबूजी या नावानं ओळखले गेले. प्रसिद्ध गीतकार ग.दि.माडगुळकर यांच्यासोबत ओळख झाल्यानंतर त्यांनी गीतरामायण कार्यक्रमाची बांधणी करुन तो कार्यक्रम महाराष्ट्रात सादर केला. बाबूजींच्या संगीतानं गीतरामायणाला वेगळी उंची मिळाली. त्याला प्रेक्षकांचा, श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. भारताबरोबरच परदेशातही त्याचे विविध कार्यक्रम पार पडले.

बाबूजींनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली होती. २९ जुलै २००२ रोजी ब्रेन हॅमरेजमुळे बाबूजींचे निधन झाले. आता प्रसिद्ध दिग्दर्शक योगेश देशपांडे हे बाबूजींच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यात प्रसिद्ध अभिनेता सुनील बर्वे हे सुधीर फडके यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

Share this article