आई आणि मुलीचं नातं हे जगावेगळं असतं. आईसोबत रक्ताचंच नातं असलं की त्यांच्या भावना खऱ्या असतात किंवा तेव्हाच ते नातं टिकतं असं नसून आई या नात्याने आपुलकीने सांभाळ करणारी एखादी स्त्री पण खऱ्या आई इतकाच जीव बाळाला लावू शकते हा विचार ‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेतून मांडला गेला आहे.
सावी ही जरी अनू आणि आदित्यची मुलगी असली तरी सुंदरीने सावीला आईचं प्रेम, आईची माया दिली आहे. त्यामुळे सुंदरी आणि सावी मधलं आई मुलीचं नातं हे दिवसेंदिवस फुलत चाललेलं प्रेक्षकांनी अनुभवलं आहे.
‘सुंदरी’ मालिका पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांना कथेशी खिळवून ठेवलं जाईल अशा घटना घडताना दाखवल्या आहेत. आता ‘सुंदरी’ ही मालिका पुन्हा एकदा नव्या वळणावर पोहचणार आहे. काही महिन्यांपूर्वी ‘साहेब’ या खलनायिकेची एंट्री मालिकेत झाली होती जी भूमिका अभिनेत्री वनिता खरात साकारत होती. आता साहेब हे पात्रं प्रेक्षकांचा निरोप घेणार असून मालिकेत रोमांचक असे सीन्स पाहायला मिळणार आहेत.