वेगवेगळ्या छटा असलेल्या भूमिका साकारायला मिळाव्यात हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. कलाकार ती भूमिका फक्त साकारत नाहीत तर त्या भूमिकेशी एकरुप होऊन ती मनापासून जगतात. स्टार प्रवाहच्या अबोली मालिकेत सुयश टिळक साकारत असलेल्या भूमिकेचं सध्या कौतुक होतंय. मालिकेत त्याने आतापर्यंत एक दोन नाही तर तब्बल १५ वेगवेगळी पात्रं साकारली आहेत.
कधी तो कडकलक्ष्मीच्या रुपात समोर येतो, तर कधी वृद्धाच्या रुपात. कधी तो रिक्षाचालक असतो तर कधी विदुषक. कधी तो दशावतारी रावण असतो तर कधी पोस्टमन. सुयशने मालिकेत परिचारिका, लमाणी स्त्री, जादुगार अशी वेगवेगळी पात्रं देखील साकारली आहेत. थोडक्यात सांगायचं तर भूमिका एक आणि त्याच्या छटा अनेक. मराठी मालिका विश्वात हा प्रयोग पहिल्यांदाच होतोय.
अबोली मालिकेतल्या या बहुरुपी पात्राविषयी सांगताना सुयश म्हणाला, ‘ही भूमिका साकारताना मी खऱ्या अर्थाने समृद्ध होतोय. एकाच मालिकेत मी आतापर्यंत १५ वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक पात्र वेगळं आहे. ते समजून घेत त्याप्रमाणे व्यक्त होणं ही वेगळी कसोटी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रत्येक पात्रासाठी तयार होताना मी आणि अबोली मालिकेची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतेय. आमचे मेकअपमन शैलेश पाठारे आणि त्यांची संपूर्ण टीम माझ्या लूकवर विशेष मेहनत घेतात. त्यामुळेच मी साकारलेलं प्रत्येक पात्र वेगळं दिसतं.’