Close

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर प्रदर्शित (‘Swargandharva Sudhir Phadke’ Trailer Is Out)

मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेलं एक अजरामर नाव म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने श्रोत्यांना तृप्त केले. 'गीतरामायणा'तील गोडव्याने, भावविभोर गीतांनी 'बाबुजीं'नी मराठी मनावर अधिराज्य केले. अशा या रसिकमनाचा ठाव घेणाऱ्या 'बाबुजीं'ची जीवनगाथा सांगणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट येत्या १ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. रामनवमीच्या पूर्वसंध्येला या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या २ मिनिटे ४५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये बाबुजींची कथा दाखवण्यात आली आहे. करिअरच्या सुरुवातीला जेव्हा ते मुंबईत आले तेव्हा त्यांना अनेक गोष्टी सोसाव्या लागल्या होत्या. एक वेळ तर अशी आली की त्यांनी हॉटेलमध्ये देखील काम करावे लागले होते. अगदी शेवटी हतबल होऊन मुंबई सोडत असताना त्यांना एक उत्तम संधी मिळते आणि ते या संधीचे सोने करताना दिसत आहेत. सुधीर फडके यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने साकारली आहे. ट्रेलरमध्ये भारत स्वातंत्र्य होतानाचा देखील काळ दाखवण्यात आला आहे. एकंदरीतच चित्रपटाचा ट्रेलर हा उत्सुकता वाढवणारा आहे. त्यामुळे चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

हा चित्रपट म्हणजे आजवरचा सर्वात भव्य स्वरमयी बायोपिक ठरणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने बाबुजी आणि त्यांच्यासोबत गायलेल्या अनेक नामवंताच्या असंख्य गाजलेल्या गाण्यांना चित्रपटगृहात नव्याने अनुभवण्याची पर्वणी या कलाकृतीच्या माध्यमातून मिळणार आहे. या चित्रपटात एकूण २७ गाणी असून या चित्रपटाच्या माध्य्मातून प्रेक्षकांना संगीत नजराणा मिळणार आहे.

सिनेमाच्या ट्रेलर लाँचला राज ठाकरे यांनी बाबूजींविषयी बोलताना सिनेमाच्या टीमलाही शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले,"मला बाबुजींचा सहवास फारसा लाभला नाही. परंतु माझ्या वडिलांचे आणि बाबुजींचे जवळचे संबंध होते. बाबुजींना जवळून भेटण्याचा योग आला नाही. बहुदा हा योग सुनिल बर्वेंमुळे येईल. बाबुजींची सगळीच गाणी अजरामर आहेत. त्यांच्या गाण्यांची खासियत म्हणजे एखाद्याला नवसंजीवनी देणे. उभारी देणे. मला खात्री आहे, या चित्रपटाला नक्कीच प्रेक्षकांची पसंती मिळेल."

'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट योगेश देशपांडे यांनी दिग्दर्शित केला असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवादही त्यांनीच लिहिली आहे.

Share this article