पद्मविभूषण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यावरील ९० मान्यवरांनी लिहिलेल्या ९० लेखांचे आणि दुर्मिळ छायाचित्रांनी नटलेल्या ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकाचे आज प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते विलेपार्ले इथल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह इथे हा प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अशोक सराफ, सुरेश वाडकर, श्रीधर फडके, रवींद्र साठे, पद्मजा फेणाणी, उत्तरा केळकर, सुदेश भोसले, वैशाली सामंत तसंच जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, पूनम ढिल्लो, पद्मिनी कोल्हापुरे हेसुद्धा उपस्थित होते. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम उपस्थित होता. त्याने भरमंचावर आशाताईंचे पाय गुलाबपाणीने धुतले. पाय धुवून त्याने आशाताईंच्या चरणी डोकं टेकवलं.
या कार्यक्रमात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हेसुद्धा उपस्थित होते. “स्वरांची देवता आणि आमच्या ताई आशाताईंसोबत यावेळी मंचावर एकत्रित येण्यापेक्षा वेगळं सुख हे कोणतं असूच शकत नाही. हे पुस्तक बनवण्याची कल्पना ज्या पद्धतीने समोर आली, त्यामध्ये पहिल्यापासून आम्ही सगळेच होतो. सगळ्या टीमने ज्या पद्धतीने या पुस्तकासाठी मेहनत घेतली, त्यावरून मी तुम्हाला नक्की सांगतो की हे पुस्तक केवळ तुम्हाला आनंद देणार नाही, सुख देणार नाही तर समाधानही देईल”, असं शेलार म्हणाले.
या कार्यक्रमात सोनू निगम म्हणाला, “आज सोशल मीडियावर गायन शिकण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. मात्र आधीच्या काळात लताजी आणि आशाजी याच होत्या. आशाताईंकडून आम्ही खूप काही शिकलो. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आम्हाला आजही त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. आपल्या हिंदू धर्मात, सनातन धर्मात गुरूंना देवाचं स्थान आणि महत्त्व दिलं जातं. आमच्यासाठी आशाताई देवी आहेत.” सनातन धर्माच्या वतीने तुमचा सन्मान करू इच्छितो असं सांगत सोनू निगमने मंचावर आशाताईंचे पाय गुलाबपाण्याने धुतले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला.