Close

मुलांना शिकवा शिष्टाचार (Teach Children Manners)

उलट बोलणे, शिवीगाळ करणे, मित्रांसोबत मारामारी… ही मुलांची सवय झाली असेल तर यात थोडी चूक तुमची देखील आहे. मुलांनी नेहमी चांगले मार्क्स मिळवावेत, सतत स्पर्धेत राहावे या अट्टाहासापायी आपण त्यांच्या या वागण्याकडे दुर्लक्ष करतो, पण मुलांनी सभ्यपणे कसे वागावे या संदर्भात काही सांगणारा हा लेख…


घर ही लहान मुलांची पहिली शाळा असते आणि आई वडिल प्रथम शिक्षक! तसं पाहता शिक्षणाचे कोणतेही वय नसते पण लहानपणापासून जर मुलांना काही शिष्टाचार, रिती शिकवल्या तर मुलांना त्याची सवय आयुष्यभरासाठी लागते. शाळेत जाण्यापूर्वीच जर मुलांना अशा चांगल्या सवयी लागल्या तर त्यांनाच फायदा होईल.

आभारप्रदर्शन शिकवा
कोणतीही गोष्ट, वस्तू मागताना कृपया (प्लीज) व मिळाल्यावर धन्यवाद (थँक्यू) म्हणायला शिकवा. जर कोणी त्यांना थँक्यू म्हटले तर वेलकम किंवा माय प्लेजर म्हणायला शिकवा. लहानपणापासून अशी सवय लागली तर मुले मोठी झाल्यावर पण या गोष्टी लक्षात ठेवतात.

साफसफाई शिकवा
प्रत्येकाला स्वतःचे घर स्वच्छ, टापटिप हवे असते. पण घरात लहान मुलं असली की घर स्वच्छ ठेवणे थोडे कठीण जाते. मुलं शाळेतून आल्यावर बॅग एकीकडे, युनिफॉर्म एकीकडे तर बूट तिसरीकडेच फेकून देतात. मुलांची ही सवय नजरेआड न करता त्यांना स्वतःच्या वस्तू तरी जागच्याजागी ठेवण्याची सवय लावा. घराची साफसफाई करताना मुलांची थोडी मदत घ्या म्हणजे लहानपणापासूनच त्यांना टापटिप राहण्याची सवय लागेल.
दुसर्‍यांच्या वस्तू सांभाळायला शिकवा कधी कधी मित्रांसोबत खेळताना मुले त्यांची खेळणी घरी घेऊन येतात. खेळता खेळता ती तोडून टाकतात. मुलांना असे करण्यापासून परावृत्त करा. स्वतःच्या वस्तूसोबतच इतरांच्या वस्तूही सांभाळून वापरायला शिकवा. तसेच दुसर्‍याच्या वस्तू न विचारता घेऊन येणं चुकीचे आहे असे समजावून सांगा. मुलांंना स्वतःच्या वस्तू उदा. पुस्तके, खेळणी, कपडे नीट ठेवण्यासाठी सांगा.

टायनिंग टेबलचे मॅनर्स शिकवा
टायनिंग टेबलवर बसून जेवण्याइतपत मुलं मोठी झाली की त्यांना खाण्यासंदर्भात काही गोष्टी शिकवल्या तर मुले बाहेर कुठे गेल्यावर आपली नाचक्की करणार नाहीत. जेवताना तोंडाचा आवाज करू नये, कमी बोलावे, तोंडात घास असेल तर शक्यतो बोलू नये इत्यादी गोष्टी मुलांना समजावून सांगा. मुले जेवताना अन्न त्यांच्या कपड्यावर पडू शकते. म्हणूनच त्यांच्या अंगावर रुमाल ठेवावा. टेबलवर बसलेले असताना कोणत्याही प्रकारे खेचाखेची, स्वतः वाढून घेण्याचा हट्ट करू नये म्हणून समजवावे. जेवढे आपण खाणार असू तेवढेच वाढून घेण्यास सांगा. जेवण झाल्यावर लगेच न उठता सर्वांचे जेवून झाल्यावर उठायला सांगा. जर आधी उठायचं असेल तर इतरांची परवनगी मागूनच मग उठा.

मोठ्यांच्या मध्ये बोलू नये.
जर दोन मोठी माणसे बोलत असतील आणि मुलांना काही सांगायचे असेल तर त्यांना दोघांचे बोलणे संपल्यावर बोलायला सांगा. जर मध्येच बोलायचे असेल तर आधी मी बोलू का म्हणून परवानगी घ्यायला शिकवा.

सर्वाचा मान ठेवायला शिकवा
मुलांना सगळ्यांचा मान ठेवायला शिकवा. मोठ्यांसोबत बोलताना अदबीने बोलयला शिकवा. त्याचप्रमाणे मुलांच्या मित्रांसोबत किंवा त्यांच्यापेक्षा छोट्या मुलांशी देखील त्यांना अदबीने बोलायला शिकवा.

सभ्य भाषेचा वापर
मुले बोलताना योग्य भाषेचा वापर करतात की नाही याकडे लक्ष द्या. अभद्र भाषा, शिव्या दिल्या आणि तुम्ही ते हसण्यावारी घेतलंत तरी मुलं नेहमीच अशा प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करतील.म्हणूनच याकडे दुर्लक्ष न करता त्यांना असे शब्द वापरू नयेत अशी सक्त ताकीद द्या.

इतरांची मस्करी करणे
बरीच मुले मित्रांसोबत खेळताना कुणा एका मित्राची, इतर सर्व मिळून मस्करी करतात. त्यामुळे कधी कधी त्यांच्यात मारामारी देखील होते. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते, असे मुलांना सांगा. प्रत्येक माणसात काही ना काहीतरी कमतरता असते. त्यामुळे कोणाचीही मस्करी
करू नये.

स्वार्थी बनू देऊ नका
जस जशी मुलं मोठी होऊ लागतात तस तशी समजूतदार होतात. पण कधी कधी मुलांसमोर अशी परिस्थिती असते की त्यांना काय करावे कळत नाही.अशा वेळी त्यांना पाठिंबा द्या. काय चूक आणि काय बरोबर यातील फरक ओळखायला शिकवा. प्रत्येक गोष्टीत स्वतःचा फायदा शोधण्याऐवजी दुसर्‍याचे नुकसान तर होत नाही, हे शोधण्याचा प्रयत्न करायला सांगा. दुसर्‍यांना त्रास होईल असे कोणतेही काम न करण्याबद्दल त्यांना सांगा.

तुझं माझं करू नये
प्रत्येक वेळी हे माझे आहे, मी कोणाला देणार नाही. हे वागणे चुकीचे आहे हे मुलांना समजावून सांगा. त्यांना आपल्या मित्रांसोबत, भावंडांसोबत वस्तू शेअर करायला शिकवा.

समाजात वावरताना
मुले कुठे बाहेर गेली असतील तर तेथे कसे वागावे यासंदर्भात त्यांना काही गोष्टी समजावून सांगा. उदा. लोकांसमोर नाका तोंडात हात घालणे, नखं चावणे अशा गोष्टी करू नयेत.

पालकांची जबाबदारी
मुले सर्वात प्रथम आपल्या आई-वडिलांकडून शिकत असतात. त्यामुळे पालकांचे वागणे उत्तम असावे. ज्या सवयी मुलांना लावायच्या आहेत त्या आधी आईवडिलांनी आत्मसात कराव्यात.


इतर काही शिष्टाचार

  1. घरी पाहुणे आल्यास मुलांना त्यांची विचारपूस करण्यास सांगा. जर मुले दुसर्‍या खोलीत अभ्यास करत असतील तर थोडा वेळ का होईना बाहेर येऊन पाहुण्यांसोबत बोलायला सांगा.
  2. कोणाच्याही खोलीत जाण्याआधी परवानगी घ्या.
  3. घरातील मोठी माणसे बाहेर जात असल्यास त्यांच्या मागे लागू नये किंवा कोणतीही गोष्ट आणण्यासाठी हट्ट धरू नये.
  4. बाहेरून कोणी आल्यास सर्वप्रथम पाणी देण्यास मुलांना शिकवा.

    मुलांना असे बोलू नका
  5. मुलांना प्रत्येक वेळी चुकीचे ठरवू नका. त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी उद्युक्त करा.
  6. मुलांची इतर भावंडासोबत तुलना करू नका.
  7. ङ्गतू वाईट मुलगा/मुलगी आहेस. सगळे तुझी तक्रार करतात, मी कंटाळले आहे तुला.फ अशा शब्दांत मुलांशी कधी बोलू नका. त्यांना प्रेमाने समजवा.
  8. मुलांच्या वाईट वर्तणुकीबद्दल त्याच्या मित्रांना कधीही दोषी ठरवू नका.

Share this article