गानसरस्वती लतादीदी मंगेशकर यांचा आज वाढदिवस! जगातील कोट्यवधी चाहते त्यांच्या आठवणीने व्याकुळ होऊन त्यांची गाणी म्हणत आहेत. लतादीदींच्या जीवनावर आधारित आरजे अनिरुद्ध चावला यांनी ‘तेरे सूर मेरे गीत’ हे इंग्रजी पुस्तक लिहिले असून त्याचे अनावरण आज केले जात आहे.
या संदर्भात बोलताना अनिरुद्ध म्हणतात, “१९९९ साली माझ्या दृष्टीने, मैलाचा दगड ठरलेली लतादीदींची मुलाखत मी घेतली होती. ही त्यांची मुलाखत सहा तासांची होती. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीतील ही प्रदीर्घ मुलाखत होईल. दीदींच्या सहवासात आलेले दिग्गज कलावंत, चित्रपट निर्माते, स्टार नायक व नायिका, संगीतकार, वादक यांच्याविषयी त्या मनमोकळेपणाने बोलल्या होत्या… इतकंच नव्हे तर आपला जीवनसंघर्ष यशापयश तसेच आपल्या कुटुंबाविषयीचा जिव्हाळा इत्यादी गोष्टींवर त्या बोलल्या होत्या.”
या मुलाखतीवर आधारित हे पुस्तक देण्यात आले असून त्याची प्रस्तावना आशा पारेख यांनी लिहिली आहे. अनिरुद्ध चावला आहे रेडिओ जॉकी व चित्रपट आणि संगीत समीक्षक आहेत. ऑल इंडिया रेडिओ तसेच रेडिओ नशा, बिग एफ एम, रेडिओ सिटी अशा चैनलवर गेली २५ वर्षे त्यांनी रेडिओ कार्यक्रम सादर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपटाचे लेखन त्यांनी केले होते.