गेल्या काही दिवसांपासून जुन्या मालिका ऑफ एअर होऊन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येण्याचे सत्र सुरुच आहे. नवनवीन विषयावर आधारित असलेल्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन तर करत आहेतच सोबत त्यांचं प्रबोधनही करत आहे. लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता अक्षर कोठारी अभिनीत ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण यामुळे घराघरात पोहोचली प्रेक्षकांची आवडती मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ आता निरोप घेण्यास सज्ज झाली आहे. काल मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस पार पडला. हा शेवटचा क्षण मालिकेतील कलाकारांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला.
'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेचा पहिला भाग ४ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसारित झाला होता. आता बरोबर दोन वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेतील शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या ही पात्र आता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहेत. या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी चाहत्यांना या सर्व पात्रांची नक्कीच आठवण येईल.
'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. मालिकेत सतत येणऱ्या रंजक ट्वीस्टमुळे नेहमीच ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या दहामध्ये राहिली आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित आहे. एकत्र कुटुंब असणं किती महत्त्वाचं असतं हे या मालिकेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काल मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे कलाकारांनी शूटिंगचा शेवटचा दिवस जबरदस्त अंदाजात साजरा केला.
मालिकेतील कलाकारांनी शूटिंगचा शेवटचा दिवस आठवणीत राहण्यासाठी व्हरांड्यातील रांगोळीत रंग भरले. एकमेकांना खास भेटवस्तू दिल्या. केक कापून सेलिब्रेशन केलं. यावेळी कलाकारांनी मालिकेचं शीर्षकगीत गाऊन केक कापला. शिवाय खास जेवणाचा बेतही केला होता.
दरम्यान, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेच्या वेळेत २० नोव्हेंबरपासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका पाहायला मिळणार आहे. या मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला आहे. गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा दाखवण्यात येणार आहे.