मराठी सिनेरसिकांसाठी यंदाचे वर्ष देखील खूपच खास असणार आहे. या वर्षात देखील मराठी सिनेरसिकांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी असणार आहे. नुकताच अभिनेते प्रतीक गांधी यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'आता वेळ झाली' या चित्रपटाची त्यांनी घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी हे मुख्य भूमिकेत असणार आहेत.
अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित आणि लिखित 'आता वेळ झाली' या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकताच रिलीज करण्यात आले आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी एकत्र काम करताना दिसणार आहेत. ‘इफ यू वाँट अ हॅप्पी एण्डिंग, यू मस्ट नो व्हेअर टू एण्ड युअर स्टोरी’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. या ओळीचा या चित्रपटाशी नेमका काय संबंध आहे. या प्रश्नाचे उत्तर २३ फेब्रुवारी रोजी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिळणार आहे.
या चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह भरत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर आणि अभिनव पाटेकर हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'आता वेळ झाली' या चित्रपटाची निर्मिती दिनेश बंसल, जी. के. अग्रवाल आणि अनंत महादेवन यांनी केली आहे.
डेल्लास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट अभिनेता), राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक) आणि लोकप्रिय जागरण चित्रपट महोत्सव, शारजाह फिल्म प्लॅटफॅार्म इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये ज्युरी अवॅार्ड यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी 'आता वेळ झाली' या चित्रपटाची यापूर्वीच निवड झाली आहे.