Close

गुपित नैसर्गिक सौंदर्याचं (The Secret Of Natural Beauty)

रातोरात काहीच मिळत नाही… सुंदर त्वचा तर मुळीच नाही! त्यासाठी नियमितपणे प्रयत्न करावे लागतात. अर्थात त्वचेची योग्य काळजी घ्यावी लागते. कशी त्याविषयीः-
पाया भक्कम असला की त्यावर उभी राहणारी इमारतही भक्कम असते… बांधकाम क्षेत्रातील हा नियम सर्व क्षेत्रात अगदी चपखल बसणारा आहे. सौंदर्याची दुनियाही याला अपवाद नाही. अर्थात, मुळात त्वचेचा पोत चांगला असेल, तर तो मुखडा सुंदरच दिसतो… मग त्यावर मेकअप असो वा नसो. बरोबर ना? म्हणूनच आपली त्वचा सुंदर अर्थात मुरुमं-सुरकुत्यांविरहित, टवटवीत, मुलायम, चमकदार असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. पण मग आपली 0जणांचं उत्तर असेल, सकाळी अंघोळ करताना आणि संध्याकाळी शाळा-कॉलेज-ऑफिसमधून घरी आल्यावर साबणाने चेहरा धुतो! पण एवढं पुरेसं आहे का? नाही. खरंच त्वचेची काळजी असेल आणि त्वचेची काळजी घेण्याची इच्छा असेल, तर काही नियम स्वतःला घालून घ्यायला हवेत आणि ते नियमित पाळायलाही हवेत. या नियमांविषयीः-
क्लिझंर
क्लिझंर म्हणजे स्वच्छ करणे. स्वच्छतेतच सुंदरता आहे, हे तुम्ही ऐकलं आणि पाहिलंही असेलच! हा नियम इथेही लागू आहे. सुंदर त्वचा हवी असल्यास, त्वचेची योग्य प्रकारे नियमित स्वच्छता आवश्यकच आहे. त्यासाठी चांगल्या दर्जाचा सौम्य साबण किंवा फेसवॉशचा वापर करता येईल. मात्र चेहर्‍यावर मेकअप लावला असेल, तर उत्तम दर्जाचा क्लिझंरच चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरायला हवा. विशेषतः रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी चेहर्‍यावरील मेकअप, लोशन, क्रीम इत्यादी योग्य प्रकारे स्वच्छ करायला हवे.
चेहरा स्वच्छ करण्यासाठी शक्यतो साबणाचा वापर करू नये. अगदी करायचा झाल्यास सौम्य, क्रीम बेस साबणाचा वापर करता येईल.
क्लिझंरची निवड त्वचा प्रकारानुसार करता येईल. तेलकट त्वचा असल्यास सौम्य क्लिझंरचा वापर करा. कोरड्या त्वचेसाठी क्रीम बेस क्लिझंर वापरायला हवा. मिश्र त्वचेसाठी मात्र जेल प्रकारातला क्लिझंर वापरण्यावर भर द्या. असा क्लिझंर चेहरा अधिक कोरडा न करता योग्य प्रकारे स्वच्छ करतो.
चाळिशीनंतर बहुतेकांची त्वचा कोरडी होऊ लागते, त्यामुळे क्रीम बेस क्लिझंर वापरण्यावर भर द्या.
संवेदनशील त्वचा असल्यास सौम्य क्लिझंर वापरा.
चेहर्‍यावर मुरुमं किंवा अ‍ॅक्ने असल्यास तेलकट क्लिझंर वापरू नका. शक्य असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य क्लिझंरची निवड करा.
मेकअप काढण्यासाठी बोटांवर, तलम कापडावर किंवा कापसाच्या बोळ्यावर मेकअप रिमुव्हर घेऊन चेहर्‍यावर गोलाकार पद्धतीने वरच्या दिशेने फिरवा. नाकाकडून केसांच्या दिशेने फिरवा. गळाही क्लिझंरच्या साहाय्याने स्वच्छ करा. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
साबण, फेस वॉश किंवा क्लिझंरच्या बाबतीत अधिक प्रयोग करू नका. तुमच्या त्वचेला मानवणार्‍या क्लिझंरचाच नेहमी वापर करा. वारंवार त्यात बदल करत राहू नका.
चेहरा कधीही अतिशय गरम वा अतिशय थंड पाण्याने धुऊ नका. कोमट पाण्याचा वापर करणंच योग्य आहे.
चेहरा वारंवार धुऊ नका आणि क्लिंंझरचा वापरही वारंवार करू नका. दिवसातून एकदा, तेही रात्री झोपण्यापूर्वी चेहरा योग्य क्लिझंरचा वापर करून स्वच्छ केल्यास उत्तम.

स्क्रबिंग
आठवड्यातून किमान एकदा स्क्रबचा वापर केल्यास दोन-चार आठवड्यातच तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल. स्क्रबच्या नियमित वापरामुळे त्वचेवरील मृतपेशी निघून जाऊन त्वचा टवटवीत, उजळ आणि मुलायम होईल.
अगदी बारीक दाणे असलेला स्क्रब वापरण्यावरच भर द्या. कारण स्क्रबमधील मोठ्या दाण्यांमुळे त्वचेची हानी होण्याची शक्यता असते.
डोळ्यांभोवतीच्या त्वचेवर स्क्रब करायचा झाल्यास, अगदी बारीक दाण्यांच्या स्क्रबचा, तेही हळूवारपणे वापर करा.
डोळ्यांभोवतीचा स्क्रब स्वच्छ करण्यासाठी मऊ कापड, टिश्यू किंवा स्पाँजचा वापर करून स्क्रब हळूवार पुसून काढा.
चेहर्‍यावर स्क्रब पसरवून त्यावर बोटांचे टोक गोलाकार पद्धतीने अगदी हळूवार फिरवा. जोरजोरात घासू नका. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
टोनिंग
प्रत्येक वेळेस चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्यावर टोनर लावणं कधीही चांगलं. चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचेवरील छिद्रं उघडली जातात. टोनरमुळे ही छिद्रं पुन्हा बंद होण्यास मदत होते. त्वचेवरील ही छिद्रं बंद न झाल्यास, त्यावर धूळ बसून संसर्ग होण्याची शक्यता वाढते, म्हणूनच क्लििंंझगएवढेच टोनिंगही महत्त्वाचे ठरते.
हल्ली बाजारात विविध कंपन्यांचे असंख्य टोनर्स उपलब्ध आहेत. शक्य असल्यास तुम्ही ज्या कंपनीचे क्लिझंर किंवा फेस वॉश वापरता, त्याच कंपनीचे टोनर वापरण्यावर भर द्या.
कापसाच्या बोळ्यावर टोनर घेऊन हळूवारपणे चेहर्‍यावर लावा. नाकापासून बाहेरच्या दिशेने आणि कपाळावरही लावा. गळ्यावरही टोनर जरूर लावा.
डोळ्यांभोवतीच्या नाजूक त्वचेवर टोनर लावणं टाळा. डोळ्यांभोवतीच्या त्वचेवरील तेल किंवा धूळ स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोल फ्री किंवा पेरॉक्साइड असणारा अगदी सौम्य टोनर वापरण्यास हरकत नाही.
मॉइश्‍चरायझिंग
चांगला मॉइश्‍चरायझर त्वचेसाठी पोषक आहाराचं काम करतो. त्यामुळे आपण कोणता मॉइश्‍चरायझर वापरतोय, याविषयी सतर्क राहायला हवं. त्यासाठी त्वचा प्रकारानुसार मॉइश्‍चरायझरची निवड करा. दिवसातून किमान एकदा (शक्यतो दोनदा) मॉइश्‍चरायझरचा वापर अवश्य करा. चेहरा खेचल्यासारखा वाटला की त्याला मॉइश्‍चरायझरची गरज आहे, असे समजा. अधिक वेळा मॉइश्‍चरायझरचा वापर केल्यास त्वचेची छिद्रं बंद होण्याची शक्यता असते, त्यामुळे मॉइश्‍चरायझरचा अतिरेक करणंही टाळा.
तेलकट त्वचा असल्यास नॉन स्टिकी मॉइश्‍चरायझरची निवड करा.
कुमार वयीन मुलींनी कोरफड किंवा फळांचा अर्क असलेल्या हर्बल बेस्ड मॉइश्‍चरायझरचा वापर करावा.
निस्तेज त्वचा असल्यास ङ्गकफ जीवनसत्त्व असलेल्या मॉइश्‍चरायझरचा वापर करा.
सनस्क्रीन
त्वचेची नियमित काळजी घेताना, तिचा अतिनील सूर्यकिरणांपासून बचाव करणेही अतिशय महत्त्वाचे आहे. कारण त्वचेची सर्वाधिक हानी ही सूर्याच्या अतिनील किरणांमुळेच होत असते. तसेच या कारणामुळे निर्माण झालेल्या त्वचेच्या समस्या दूर व्हायला अतिशय वेळ लागतो. यावरील सर्वात सोपा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे चेहर्‍यावर नियमितपणे सनस्क्रीन लावणे.
योग्य परिणामांकरिता किमान एसपीएफ 15 असणारी सनस्क्रीनची निवड करणं योग्य ठरेल.
सनस्क्रीन लावताना ते कपाळावर, गालांवर आणि नाकावर योग्य प्रकारे लागले आहे, याची खात्री करून घ्या. कारण चेहर्‍याच्या या भागांवरील त्वचेची सर्वप्रथम आणि सर्वाधिक हानी होते.

नाइट क्रीम
दिवसभर त्वचेची काळजी घेतल्यानंतर रात्री तिच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? त्वचेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नाइट क्रीम वापरणं गरजेचं आहे. पस्तिशीनंतरच्या लोकांसाठीच नाइट क्रीम हा प्रकार असतो, असा अनेकांचा गैरसमज आहे. वास्तविक विशीनंतरच नियमितपणे नाइट क्रीमचा वापर करणं हितावह आहे. कारण विशीनंतरच चेहर्‍यावर थोड्या फार बारीक रेषा येऊ लागतात आणि वेळीच काळजी न घेतल्यास याच रेषा पुढे तिशीनंतर सुरकुत्यांचे रूप धारण करतात. असे होऊ नये असे वाटत असल्यास, विशीनंतरच नियमितपणे नाइट क्रीमचा वापर सुरू करायला हवा. नाइट क्रीमच्या वापरामुळे दुसर्‍या दिवशी चेहरा ताजातवाना आणि आरोग्यदायी दिसतो.
रात्रीच्या वेळी अतिनील सूर्यकिरण किंवा प्रदूषणाचा प्रश्‍नच उद्भवत नाही. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करेल, त्वचेवरील मुरुमं, डाग, डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं यांवर योग्य उपचार करून त्वचेला पोषण देणार्‍या क्रीमची निवड करायला हवी.
नाइट क्रीम त्वचेच्या आतापर्यंत जाऊन ओलावा निर्माण करते.
नाइट क्रीम पापण्यांवर लावू नका, अन्यथा सकाळी उठल्यावर पापण्यांवर सूज असल्यासारखे दिसेल.
नाइट क्रीम झोपण्याच्या अर्धा तास अगोदर लावा, म्हणजे ते उशीला लागून पुसून जाणार नाही.
तुमचं वय कितीही असो, त्वचा प्रकार कोणताही असो किंवा तुम्हाला सौंदर्याच्या-त्वचेच्या कोणत्याही समस्या असोत, या प्रकारे त्वचेची नियमित काळजी घ्यायला सुरुवात करण्यासाठी अजूनही उशीर झालेला नाही, हे ध्यानात ठेवा. आणि ङ्गकल करे सो आज कर और आज करे सो अब!फ या म्हणीनुसार आज आणि आत्तापासूनच हे स्किन केअर रुटिन पाळायला सुरुवात करा.

Share this article