बॉलीवूड अभिनेत्री काजोल लवकरच ‘द ट्रायल-प्यार, कानून, धोका’ या वेब सीरिजमधून ओटीटीवर डेब्यू करत आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री काजोलने नोयोनिका सेनगुप्ता ही भूमिका साकारली आहे. १२ जून रोजी या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून वेब सीरिजची बरीच चर्चा सुरू आहे. ‘द ट्रायल-प्यार, कानून, धोका’ ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.
अभिनेत्री काजोलने साकारलेल्या पात्राचे म्हणजेच नोयोनिका सेनगुप्ताचे पती, अतिरिक्त न्यायाधीश राजीव सेनगुप्ता यांना लाच म्हणून लैंगिक संबंधांची मागणी केल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात येते. सेक्स स्कॅण्डलप्रकरणी पतीला अटक झाल्यावर नोयोनिकावर दोन मुलींची जबाबदारी असते. आपल्या मुलींमुळे ती पुन्हा एकदा वकील म्हणून कामावर रुजू होऊन आपला प्रवास सुरू करते. कालांतराने तिचा पती नोयोनिकाकडे त्याची केस लढण्यासाठी विनंती करतो, असा घटनाक्रम ‘द ट्रायल…’च्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे.
‘द ट्रायल-प्यार, कानून, धोका’ वेब सीरिजचा संपूर्ण दोन मिनिटांचा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. तसेच ट्रेलर रिलीज झाल्यावर नेटकऱ्यांनी काजोलच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले आहे. काजोलला नेहमीपेक्षा हटके भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. एकंदर लैंगिक संबंधांची मागणी, न्यायालयातील लढाई आणि सामान्य गृहिणीचा वकील होण्यापर्यंतचा प्रवास या कथानकावर ही सीरिज आधारित असल्याचे ट्रेलर पाहून लक्षात येते, परंतु आता प्रत्यक्षात गोष्ट कशी असेल याचा उलगडा ४ जुलैला होणार आहे. ‘द ट्रायल-प्यार, कानून, धोका’ ही सीरिज ४ जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, मध्यंतरी अभिनेत्रीने सोशल मीडियावर चिंताजनक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र, त्यानंतर नवी पोस्ट शेअर करून हा सगळा या ‘द ट्रायल…’ सीरिजच्या प्रमोशनचा एक भाग असल्याचे काजोलने स्पष्ट केले होते. सीरिजच्या प्रमोशनसाठीच काजोलने हा प्रकार केल्यामुळे नेटकरी तिच्यावर संतापले होते, परंतु आता वेब सीरिजचा ट्रेलर पाहिल्यावर तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.