‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री (vivek Agnihotri) आणि पत्नी पल्लवी जोशी (Pallavi Joshi) त्यांच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. विवेक अग्नीहोत्री आता ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमा घेऊन येत आहेत. खुद्द विवेक अग्नीहोत्री यांनी ट्वीटरवर ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War Teaser) सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला आहे.
मंगळवारी स्वातंत्र्यदिनाचं निमित्त साधत निर्मात्याने सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला आहे. संपूर्ण देश करोनाच्या विळख्यात असताना, त्यावर उपाय शोधण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या संशोधकांवर आधारित असलेल्या या सिनेमाची सुरुवातीपासूनच चर्चा सुरू होती. आता याचा टीझरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
जेव्हा जगभरात कोविड-१० मुळे हाहा:कार माजला होता, तेव्हा अनेकांना कोरानाची लागण झाली होती. तर अनेकांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. कोरोनावर मात करण्यासाठी देशात एक लस तयार करण्यात आली होती. कोरोना काळात डॉक्टर आणि शास्त्रज्ञांना देखील अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला होता. 'ही एक अशी लढाई जी तुम्ही सर्वांनी लढली. परंतु त्याबबात तुम्हाला माहिती नाही पण ही लढाई तुम्ही जिंकली आहे. अशी ही या सिनेमाची टॅगलाइन आहे.
‘द व्हॅक्सिन वॉर’ पहिला सिनेमा आहे, ज्यामध्ये भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चद्वारे कोव्हॅक्सिन बनवण्याचा प्रवास दाखण्यात येणार आहे. या चित्रपटात विवेक अग्नीहोत्री यांनी सत्य घडलेली घटना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
'द वॅक्सिन वॉर' या चित्रपटात अभिनेत्री पल्लवी जोशी आणि अभिनेता नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आय.सी.एम.आर) माजी महासंचालक बलराम भार्गव यांची भूमिका नाना पाटेकर साकारत आहेत. भारत सरकारनं २०१४ मध्ये, बलराम भार्गव यांना त्यांच्या वैद्यकीय (कार्डिओलॉजी) क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. त्यांनी करोना काळात केलेल्या कार्यावर चित्रपटातून प्रकाश टाकणार आहे. या चित्रपटात अनुपम खेरसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
या सिनेमाचं बऱ्यापैकी शूटिंग हे लखनऊमध्ये झालं होतं. गोपाळ सिंग आणि दिव्या सेठ हे कलाकारसुद्धा या चित्रपटात आहेत. टीझर प्रदर्शित करत विवेक अग्नीहोत्री यांनी सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची देखील घोषणा केली आहे. सिनेमा २८ सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.