Close

बॉलीवूडच्या या कलाकारांनी पडद्यावर साकारली शिक्षकाची भूमिका (These Bollywood Actors Played A Teacher On Screen)

सध्या वरुण धवन अन्‌ जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला 'बवाल' हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता वरुण धवन इतिहासाच्या शिक्षकाची भूमिका साकारत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांनी यापूर्वी शिक्षकांच्या भूमिकेत उत्तमोत्तम कामं केली आहेत. वरुण धवनचा यशाचा आलेख पाहता त्याला एका हिटची गरज आहे. पण 'बवाल' रिलीज होण्यापूर्वी जाणून घेऊया, मोठ्या पडद्यावर शिक्षकांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचे रिपोर्ट कार्ड...

हृतिक रोशन : सुपर ३० (१२ जुलै २०१९)

बिहारची राजधानी पटना येथील गणितज्ञ आनंद कुमार यांच्या बायोपिक 'सुपर ३०' मध्ये हृतिक रोशनने आनंद कुमार यांची भूमिका साकारली होती. एक शिक्षक गरीब मुलांना अभियंता बनवण्यासाठी कसे झटत असतो हे या चित्रपटात दाखवले आहे. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटातील हृतिक रोशनच्या कामाचे खूप कौतुक झाले.

अमिताभ बच्चन : आरक्षण (१२ ऑगस्ट २०११)

'आरक्षण' चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी प्राचार्य प्रभाकर आनंद यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे असे मानणाऱ्या आदर्श शिक्षकाची भूमिका साकारली होती. ज्या मुलांना पैशाअभावी उच्च शिक्षण शुल्क घेणे परवडत नाही, अशा मुलांना ते मोफत शिकवतात, असे यात दाखवले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले होते.

शाहिद कपूर : पाठशाला (१६ एप्रिल २०१०)

शाहिद कपूरने 'पाठशाला' चित्रपटात इंग्रजी आणि संगीत शिक्षक राहुलची भूमिका साकारली होती. मिलिंद उके दिग्दर्शित हा चित्रपट भारतीय शिक्षण व्यवस्था आणि त्यातील उणिवांचा वेध घेतो. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही, पण या चित्रपटातील शाहिदची भूमिका मात्र नावाजली गेली.

आमिर खान : तारे जमीन पर (२१ डिसेंबर २००७)

हिंदी चित्रपटसृष्टीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने 'तारे जमीन पर' या चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात आमिर खानने राम शंकर निकुंभची भूमिका साकारली होती, जो इशान अवस्थी या गतिमंद मुलाला अभ्यासासाठी प्रवृत्त करताना दिसतो. आमिर खानचा हा चित्रपट डिस्लेक्सिक नावाच्या आजारावर आधारित आहे, हा चित्रपट अतिशय गाजला होता. खुद्द आमिर खाननेच या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते.

बोमन इराणी : मुन्ना भाई एमबीबीएस' (१ सप्टेंबर २००६)

अभिनेता बोमन इराणीने दोन चित्रपटांमध्ये शिक्षकाची भूमिका साकारली आहे. संजय दत्तचा सुपरहिट चित्रपट 'मुन्ना भाई एमबीबीएस' मध्ये त्याने पहिल्यांदा मेडिकल कॉलेजच्या डीनची भूमिका केली होती. यानंतर तो आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' चित्रपटात व्हायरसच्या भूमिकेत दिसला होता. त्यांचे हे पात्र संस्मरणीय ठरले. '3 इडियट्स' २५ डिसेंबर २००९ रोजी रिलीज झाला होता. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले होते.

शाहरुख खान : मोहब्बतें (२७ ऑक्टोबर २०००)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने 'मोहब्बतें' चित्रपटात संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. शाहरुख खानने या चित्रपटात राज आर्यन मल्होत्राची व्यक्तीरेखा साकारली आहे, जो विद्यार्थ्यांना संगीत शिकवता शिकवता प्रेमाचे धडे देताना दिसतो. आदित्य चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला होता. या चित्रपटात शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री होती.

अनिल कपूर : अंदाज (८ एप्रिल १९९४)

डेव्हिड धवन दिग्दर्शित 'अंदाज' या चित्रपटात अनिल कपूरने अजय कुमार सक्सेना नावाच्या शिक्षकाची भूमिका साकारली होती. अजयकुमार सक्सेना यांनी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले असते, त्याच महाविद्यालयात त्यांना शिक्षकाची नोकरी मिळते. त्यांच्या वर्गात शिकणारी जया ही विद्यार्थीनी अजय कुमार सक्सेनाला लग्नासाठी प्रपोज करते. जयाच्या खोडसाळपणाला कंटाळून अजय कुमार सक्सेना सरस्वती नावाच्या अशिक्षित अनाथ मुलीशी लग्न करतो. या चित्रपटात जयाची भूमिका करिश्मा कपूरने केली होती आणि सरस्वतीच्या भूमिकेत जुही चावला होती.

धर्मेंद्र : चुपके चुपके (११ एप्रिल १९७५)

'चुपके चुपके' चित्रपटात धर्मेंद्र यांनी वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक परिमल त्रिपाठी यांची भूमिका साकारली होती. एका बंगल्याचा चौकीदार एकदा त्याच्या आजारी नातवाला भेटायला गावी जातो तेव्हा त्याला मदत करण्यासाठी प्रोफेसर परिमल त्रिपाठी, त्याचा म्हणजे प्रिय मोहन अलाहाबादी असा वेश धारण करतात. या चित्रपटात शर्मिला टागोर आणि अमिताभ बच्चन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हृषिकेश मुखर्जी यांनी केले होते.

जितेंद्र : परिचय (८ ऑक्टोबर १९७२)

'परिचय' चित्रपटात जितेंद्र यांनी शिक्षक राजची भूमिका साकारली होती, जो रायसाहेबांच्या घरी जाऊन त्यांच्या नातवंडांना शिकवतो. राय साहेबांची भूमिका प्राण यांनी केली होती आणि त्यांच्या मोठ्या नातीची भूमिका जया भादुरीने केली होती. अभ्यासासोबतच रवी रायसाहेबांच्या नातवंडांना आणि नातील जीवनाचा मार्ग शिकवतो. नंतर रवी आणि रमा लग्न करतात. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुलजार यांनी केले होते.

शम्मी कपूर: प्रोफेसर (११ मे १९६२) शम्मी कपूरने 'प्रोफेसर' चित्रपटात प्रीतमची भूमिका साकारली होती. जो त्याच्या आईच्या उपचारासाठी एक तरुण स्त्री आणि दोन शाळकरी मुलांना शिकवतो. प्रीतम जिथे शिकवायला जातो तिथे त्याच्या पालकाची अट असते की शिक्षक हा वयस्कर व्यक्ती असावा. त्यामुळे प्रीतम म्हाताऱ्याचा वेश धारण करून शिकवायला जातो. या चित्रपटाचे दिग्दर्शन लेख टंडन यांनी केले होते.

Share this article