Close

‘टायटॅनिक’मधील रोजचा जीव वाचवणाऱ्या ‘त्या’ आयकॉनिक दरवाज्याचा लिलाव; रोजच्या ड्रेसचीही लागली बोली (‘Titanic’ door that saved Kate Winslet sells for whopping $718,750)

काही चित्रपट असे असतात, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलेले असते. टायटॅनिक (Titanic) हा चित्रपट त्याच चित्रपटांपैकी एक आहे. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला टायटॅनिक हा चित्रपट आयकॉनिक चित्रपटांपैकी एक आहे. लोक आजही हा चित्रपट आवडीनं बघतात. आज २७ वर्षानंतरही टायटॅनिक चित्रपटाची क्रेझ कायम आहे.

या चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रियो (Leonardo DiCaprio) आणि केट विंसलेट (Kate Winslet) यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. टायटॅनिक या चित्रपटातून या दोन्ही कलाकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. या चित्रपटाने लिओनार्डो डी कॅप्रियो आणि केट विन्सलेट यांच्या अभिनयास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. जागतिक इतिहासातील सर्वात जास्त आवडला जाणारा हा चित्रपट ठरला आहे. नुकतेच टायटॅनिक चित्रपटाशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. टायटॅनिक चित्रपटातील वस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे.

रोजचा जीव वाचवणाऱ्या दरवाज्याचा लिलाव

टायटॅनिक हा चित्रपट ज्यांनी पाहिला असेल त्यांना या चित्रपटातील शेवटचा आयकॉनिक सीन नक्की आठवत असेल. या चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये ज्या दरवाज्यामुळे रोजचा जीव वाजतो त्या दरवाज्याचा आता लिलाव करण्यात आला आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, हा दरवाजा $718,750 (सुमारे 5 कोटी रुपये) मध्ये विकला गेला आहे.

केट विंसलेटच्या ड्रेसचा देखील लिलाव

रिपोर्टनुसार, टायटॅनिक या चित्रपटात अभिनेत्री केट विंसलेटनं परिधान केलेल्या ड्रेसचाही लिलाव करण्यात आला आहे. केटच्या ड्रेसचा लिलाव $125,000 (सुमारे 99,00,205 रुपये) मध्ये झाला. पण टायटॅनिक या वस्तू खरेदी करणाऱ्यांची नावे अजून समोर आलेली नाहीत.

जेम्स कॅमेरून यांनी टायटॅनिक या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट रिलीज होऊन जवळपास २७ वर्षे झाली आहेत, तरी देखील लोक आजही हा चित्रपट आवडीनं बघतात. अन्‌ आता तर चित्रपटात वापरल्या गेलेल्या वस्तूंना एवढी किंमत मिळतेय हे कळल्यानंतर आजही या इतिहास निर्माण करणाऱ्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात त्याचं काय स्थान आहे ते कळतं. नव्हे काय?

Share this article