करोना या महामारीच्या काळात एकमेकांच्या गाठीभेटी घेणं दुरापास्त झाल्याने डेटिंग करणाऱ्यांचे वांधे झाले होते. आता वातावरण थोडेसे निवळले असले तरी गेल्या वर्षी घालण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे 'डेटिंग' करणे फारच कठीण होऊन बसले होते.
तरुणांचा होत असलेला हा कोंडमारा पाहून व त्यांच्या असहाय्यतेची जाणीव ठेवून 'टिंडर' या ॲपने त्यांच्याशी संवाद साधला. त्यातून विद्यमान परिस्थितीचे व भविष्यकालीन डेटिंगचे स्वरूप काय असेल, याची कल्पना आली. टिंडरने ज्या तरुण, अविवाहितांशी संवाद साधला, त्यापैकी निम्म्याहून अधिक सदस्यांनी आपल्याशी जुळवून घेणाऱ्या व्यक्तीशी व्हिडिओ चॅटिंग केलं. या व्यक्ती १८ ते २५ या वयोगटातील होत्या. फेब्रुवारी २०२० ते फेब्रुवारी २०२१, या १ वर्षात हा आढावा घेतला गेला.
करोनाच्या साथीमुळे आपण घरात बंदिवान झालो आहोत. त्यामुळे समाज माध्यमाद्वारे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी त्यांना टिंडर मार्फत संधी देण्यात आली. त्यामधून भविष्यकालीन डेटिंग अस्थिर असल्याचे लक्षात आले. त्याचप्रमाणे पारदर्शकता व प्रामाणिकपणा ही नवीन पिढीची वैशिष्ट्ये असल्याचे आढळले.
डेटिंग, अर्थात् ऑनलाईन गाठीभेटींमधून 'वेअर ए मास्क' हे वाक्य १०० पटीने वाढले होते. सुमारे २ हजार अविवाहित तरुण-तरुणींने सांगितले की डेटिंग करण्यापूर्वी स्वच्छता व आरोग्याला महत्त्व देत आहोत. ६६ टक्के लोकांनी मास्क घालण्याच्या सवयीबाबत जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. प्रत्यक्ष भेटीत ६ फूट अंतराचे पालन केले. यावरून स्वतःची काळजी घेण्याबाबत नवी पिढी जागरूक असल्याचे दिसून येते.
या डेटिंगबाबत भावी स्थिती काय असेल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असं लक्षात आलं की, प्रत्यक्ष भेटणे जोखमीचं असल्याने समाज माध्यमावर संवाद सुरू ठेवणं, हे वरदान ठरलेलं आहे. न्यू नॉर्मल डेटिंगचा हा प्रकार अनेकांच्या पचनी पडला आहे. ऑनलाईन भेटल्याने करोनाच्या बिकट काळातून मुक्त झाल्यासारखे वाटते आहे, अशा प्रतिक्रिया ६७ टक्के लोकांनी दिल्या.
या मंचावर 'कडल' अर्थात् आलिंगन वा घट्ट मिठी या शब्दाचा वापर २३ टक्के वाढला होता. तर हॅन्ड होल्डींग अर्थात् हातात हात या शब्दाचा वापर २२ टक्के वाढला होता. भविष्य काळात या लहानसहान स्पर्शांचा मोठा प्रभाव दिसून येईल, असे मत झाले. तसेच बायोजचा उपयोग करून हातात हात धरणे, मिठी मारणे, केसांवरून हात फिरवणे, अशा आपुलकीच्या कृती आढळून येतील.