रितेश देशमुख यांची भूमिका असलेली मानवी भावना आणि नाट्याने भरलेली पिल ही सीरिज जिओ सिनेमावर १२ जुलैपासून सुरू होत आहे. या सीरिजबद्दल उत्कंठा वाढवणारे पोस्टर काही दिवसांपूर्वीच सादर झाले होते. त्यानंतर आता या सीरिजचा ट्रेलर आला आहे. आपल्या रोजच्या आरोग्यदायी जगण्याशी संबंधित फार्मास्युटिकल किंवा औषध उद्योगक्षेत्राचे जग नेमके कसे आहे, याची एक झलक या ट्रेलरमधून पहायला मिळते. रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसव्हीपी मुव्हीज यांची निर्मिती आणि राज कुमार गुप्ता यांनी निर्मिलेल्या पिल या सीरिजमध्ये पवन मल्होत्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.
पिलमध्ये आपली ओळख होते प्रकाश चौहान या व्यक्तिरेखेशी. ही व्यक्तिरेखा रितेश देशमुख यांनी साकारली आहे. भारतातील फार्मास्युटिकल जगताच्या मुळाशी असलेल्या रहस्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ही व्यक्तिरेखा करते. बलाढ्य फार्मा उद्योजक, भ्रष्टाचारी डॉक्टर्स ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, स्वत:चा फायदा पाहणारे औषध नियामक, राजकारणी, पत्रकार आणि या सगळ्या विरोधात आवाज उठवणारे अशा अनेक माणसांच्या माध्यमातून ही कथा पुढे सरकते. पवन मल्होत्रा यांनी साकारलेल्या फार्मा कंपनीच्या सीईओचा सामना प्रकाशशी होतो आणि यातूनच सुरुवात होते रुग्णांऐवजी फायद्याला महत्त्व देणाऱ्या या बलाढ्य चक्रातील सत्य शोधून काढण्यास.
सीरिजमध्ये पदार्पण करण्याबाबत रितेश देशमुख म्हणाले, “डिजिटल स्ट्रीमिंगच्या जगात पदार्पण करताना मला आनंद वाटतोय. पिलसारखी रोमांचक आणि महत्त्वाची कथा असते तेव्हा त्या कथेला पूर्ण न्याय देण्याची फार मोठी जबाबदारी तुमच्यावर येऊन पडते. आपलं दैनंदिन आयुष्य आणि एकूणच आरोग्यावर प्रचंड परिणाम करणारी एखादी गोळी ही खरंतर सामान्य बाब आहे. पण, त्यातील ही प्रचंड गुंतागूंत समजून घेणे फार औत्सुक्याचे होते. हा प्रवास बरंच काही शिकवणारा होता. या सीरिजमध्ये आपले सर्वस्व ओतणाऱ्या राज कुमार गुप्ता आणि रॉनी स्क्रूवाला यांच्यासारख्या द्रष्ट्यांसोबत काम करणे हा खरेतर माझाच सन्मान आहे. प्रकाश चौहान ही व्यक्तिरेखा म्हणजे साधेपणा आणि हिमतीचा मेळ आहे. फार्मा कंपन्यांमधील भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई प्रेक्षकांनाही आपलीशी वाटेल, असा मला विश्वास आहे.”
रॉनी स्क्रूवाला यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले, “आजवर कधीही सांगितली न गेलेली कथा, महत्त्वाचे प्रश्न विचारणारी आणि विचारांना चालना देणारी पिलसारखी अस्सल आणि मूळ कथा प्रेक्षकांसाठी आणताना आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. पिलमधून आम्ही मनोरंजनासोबतच लोकांमध्ये जागरुकता आणण्याचा प्रयत्न करत आहोत. रितेशने आपल्या दमदार अभिनयाने या सीरिजला नव्या उंचीवर नेले आहे. यातून तो सीरिजच्या क्षेत्रात पदार्पण करत असल्याने ती आणखीनच महत्त्वाची बाब ठरते.
राज कुमार गुप्ता म्हणाले, “माझ्या प्रेक्षकांपर्यंत वेगवेगळ्या कथा विविध प्रकारच्या सिनेमांतून आणणं हा माझ्या आनंदाचा भाग आहे आणि सिनेमाचा पडदा हे कायमच माझे आवडते माध्यम राहिले आहे. आता मी ओटीटीवर लाँग फॉरमॅटचा प्रयत्न करतोय. पिलसारखी कथा याच पद्धतीने सांगितली जायला हवी आणि त्यासाठी जिओसिनेमाची साथ लाभल्याचा मला आनंद आहे.”
फार्मास्युटिकल जगताची काळी बाजू, त्यातील भ्रष्टाचाराविरोधातील हा हिमतीचा लढा म्हणजेच पिल १२ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे फक्त जिओ सिनेमा प्रीमिअमवर!