एकापेक्षा एक ॲक्शनमध्ये पटाईत असलेल्या ३ महिला सुपरहिरोंचा ‘द मार्वल्स’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. इंग्रजीसह हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार असून त्याचे दिग्दर्शन निया डिकोस्टा यांनी केले आहे.
या चित्रपटात शक्तिशाली अव्हेंजर्सपैकी एक असलेली कॅरोल डॅनव्हर्स उर्फ कॅप्टन मार्वलने सुपर इंटेलिजन्सला पराभूत करून जुलमी ‘क्री’ सोबत आपली ओळख प्रस्थापित केली असते. मात्र काही घटना अशा घडतात की, अस्थिर विश्वाला वाचवण्याचा भार पुन्हा कॅरोलच्या खांद्यावर येतो. या घटनांमुळे कॅरोलला क्री बंडखोरांच्या विवरात जावं लागतं. पण या विवरात शिरल्यानंतर तिच्या शक्ती क्षीण होतात अन् तिची निस्सिम भक्त असलेल्या कमला खान उर्फ मिस मार्वल आणि कॅप्टन मोनिका रॅमब्यू या दोघींच्या शक्तीसोबत कॅरोलच्या शक्तींची गुंतागुंत निर्माण होते. या त्रांगड्यातून बाहेर पडण्यासाठी या तीन सुपर हिरो महिला एकत्र येतात व बलवान दुष्ट शक्तींशी लढा देऊन यशस्वी होतात.
मार्वल स्टुडिओच्या या चित्रपटात ब्री लार्सन, टेयोनो पॅरीस, इमान वेलानी या तीन अभिनेत्रींसह सॅम्युअल जॅक्शन, झावी अॅशटन, पार्क सिओ जून यांच्या प्रमुख भूमिका आहेत. केविन फिग निर्मित हा बहुभाषिक चित्रपट दिवाळीचे खास आकर्षण असल्याची बातमी आहे.