बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना लग्न झाल्यापासून फिल्मइंडस्ट्रीपासून दूर आहे. अभिनय सोडल्यानंतर तिने लेखणी हातात घेतली. ट्विंकलने आतापर्यंत चार पुस्तके लिहिली आहेत. दरम्यान ट्विंकल खन्नाने काही वर्षांपूर्वी सोडलेले शिक्षणही पूर्ण केले आहे. आता वयाच्या ५० व्या वर्षी ती पदवीधर झाली आहे. पत्नीने पदवी मिळवल्यानंतर अक्षयने खास पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं आहे.
ट्वींकलने तिचा लेक आरवसह परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेतला होता. आता तिचं शिक्षण पूर्ण झालं असून तिला पदवीदेखील मिळाली आहे. अक्षयने बायकोसाठी खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे.
ट्विंकल खन्ना एक लेखिका म्हणून लोकप्रिय आहे. कोरोनानंतर तिने आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लंडन विद्यापीठात पिक्शन रायटिंग मास्टर प्रोग्रेममध्ये तिने प्रवेश घेतला. आता यासंदर्भातील तिचं शिक्षण पूर्ण झालं आहे. ट्विंकल खन्नावर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
अक्षय कुमारने पत्नीसाठी खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, "दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला अभ्यास करण्याबद्दल सांगितलं त्यावेळी मला खरचं आश्चर्य वाटलं होतं. पण अभ्यासाच्या वेडापायी तू घेत असलेली मेहनत पाहून मला वाटलं की मी एका सुपरवुमनसोबत लग्न केलं आहे. घर, करिअर आणि मुलांकडे लक्ष देण्यासोबत तू विद्यार्थी म्हणूनदेखील चांगली कामगिरी केली आहेस. मीदेखील अभ्यास केला असता तर मला अधिक चांगल्या शब्दात तुझ्याबद्दलचा अभिमान व्यक्त करता आला असता. टीना...खूप शुभेच्छा आणि खूप-खूप प्रेम".
अक्षयसह ट्विंकल खन्नादेखील एक खास पोस्ट शेअर केली आहे. पदवीचा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,"अखेर मी पदवीधर झाले. हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. या दिवसाला खास करण्यात माझ्या कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. आपण नेहमीच काही ना काही करायला स्वत:ला प्रेरणा द्यायला हवी. मग ते योग्य असो किंवा अयोग्य".
ट्विंकल तुझे खूप खूप अभिनंदन!