Close

जान्हवी कपूरच्या ‘उलझ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज (Ulajh Teaser Released)

'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेल्या जान्हवी कपूरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. तिने आपल्या विविधांगी भूमिकेच्या माध्यमातून अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली आहे. अशातच जान्हवी सध्या 'उलझ' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच अभिनेत्रीच्या या आगामी चित्रपटाचा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

जान्हवी कपूर 'उलझ' चित्रपटामध्ये भारतीय वन विभागातील अधिकारी (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर -IFS) सुहानाच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाचे कथानक देशभक्तीवर आधारित आहे. तरुण मुत्सद्दी सुहाना भोवती फिरणारे कथानक आहे. चित्रपटात सुहाना देश आणि तिच्या विरोधात रचलेले षडयंत्र आणि कट- कारस्थान उधळून देताना दिसत आहे. सध्या जान्हवी कपूरच्या ह्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

"लबाडी, फसवणूक आणि विश्वासघाताच्या जगात प्रवेश करा" असं कॅप्शन देत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिच्या चित्रपटाचा टीझर शेअर केलेला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये सस्पेंस आणि थ्रिलर पहायला मिळत आहे. "गद्दारी की कीमत सिर्फ जान से चुकाई जा सकती है।" चित्रपटातल्या ह्या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सुधांशू सारिया दिग्दर्शित हा चित्रपट ५ जुलै २०२४ मध्ये रिलीज होणार आहे. जान्हवी कपूरसोबत चित्रपटामध्ये आदिल हुसैन, राजेश तैलंग, मियांग चांग, ​​राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची निर्मिती विनीत जैन यांनी केली आहे.

'उलझ' चित्रपटासोबत जान्हवी 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासोबतच जान्हवी वरुण धवनसोबत 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या चित्रपटातही दिसणार आहे.

Share this article