Close

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतून मालिकाविश्वात पहिल्यांदाच AIचा वापर (Using Ai For The First Time In Serial Tu Bhetshi Navyane)

सोनी मराठी वाहिनीवर नुकताच नव्या मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. मालिकेचे नाव आहे 'तू भेटशी नव्याने'. या मालिकेत सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची नवी कोरी जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

अभिनेता सुबोध भावे हे यापूर्वी नाटक, चित्रपट, विविध मालिका यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांनी साकारलेल्या विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सुबोध भावे आता काय नवीन घेऊन येणार, अशी चर्चा सगळीकडे रंगत असतानाच सोनी मराठी वाहिनीवरील 'तू भेटशी नव्याने' मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. सुबोध भावे यांनी मालिकेमध्ये पुनरागमन केलं आहे. पुनरागमन म्हटलं तर धमाकेदार सुरुवात हवीच!

सुबोध भावे अशा प्रकारचीच धडाकेबाज भूमिका घेऊन आले आहेत. सोबतच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सोनार पाहायला मिळणार आहे. शिवानीने आजवर निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता ती सोनी मराठी वाहिनीवरील  'तू भेटशी नव्याने' या मालिकेत झळकणार आहे. 'तू भेटशी नव्याने' मालिकेबद्दलच्या उत्सुकतेमुळे प्रेक्षकांनी सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा पाऊस सोनी मराठी वाहिनी आणि सुबोध, शिवानी यांच्यावर झाला आहे.

या प्रोमोत आपल्याला सुबोधच्या दोन व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहेत. अभिमन्यू आणि माही अशी त्या व्यक्तिरेखांची नावं आहेत. ऐन चाळिशीतील अभिमन्यू सर कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहेत तर ऐन विशितला तरुण सुबोधही या मालिकेत दिसणार आहे. त्या व्यक्तिरेखेचं नाव माही आहे आणि AI च्या माध्यमातून हा २५ वर्षांपूर्वीचा तरुण सुबोध दाखविला जाणार आहे. अशा प्रकारे साकारलेली एक व्यक्तिरेखा दूरचित्रवाणीवर पहिल्यांदाच सादर केली जाणार आहे आणि हे पहिलं पाऊल सोनी मराठी वाहिनीने उचललं आहे.

'तू भेटशी नव्याने' या मालिकेच्या प्रोमोमध्ये २५ वर्षांपूर्वीच्या कॉलेजमधल्या आठवणी जाग्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सुबोध भावे हा अतिशय तरुण दिसतोय. तो माही या तरुण मुलाच्या भूमिकेतही दिसणार आहे आणि एका शिक्षकाच्याही. हा प्रोमो शेअर करताना सोनी मराठी वाहिनीने म्हटलं आहे.

''नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची! कारण, जगायला श्वासाची नाही तर प्रेमाची गरज असते!'' AI चा वापर करून ह्या मालिकेतील व्यक्तिरेखा साकारली जाणार असल्याने  'तू भेटशी नव्याने' ह्या मालिकेमुळे मालिका जगतात वेगळीच चर्चा निर्माण झाली आहे.  २५ वर्षांपूर्वीचा सुबोध आणि आत्ताचा सुबोध अशा व्यक्तिरेखा दिसणार आहेत आणि ही एक प्रेमकथाही आहे यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरेल यात शंका नाही. तू भेटशी नव्याने' ही मालिका लवकरच सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Share this article