Close

सुट्टीचा सदुपयोग (Utilization Of Vacation)

एप्रिलच्या मध्यावर शाळा-कॉलेजला सुट्ट्या लागतील. सुट्टी लागली की खूप हायसे वाटते. थोड्या दिवसांनंतर मात्र सुट्टीचा कंटाळा यायला लागतो नि मग काय करावे हा प्रश्‍न पडतो. यासाठी काही खास पर्याय.

फ्रिलान्सिन्ग
तुमच वाचन दांडगं आहे नि तुम्हाला लेखनाची अत्यंत आवड आहे. तर हा पर्याय तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल. तुम्ही लिहिलेल्या कथा, लेख, कविता तुम्ही वृत्तपत्र, मासिकांमधून प्रसिद्ध करू शकता. त्यातून तुम्हाला मानधनही मिळेल. तसेच तुमच्या ज्ञानात भर पडेल. लेखन कौशल्याला नवी झळाळी मिळेल. अन् नवा अनुभव गाठीशी जोडला जाईल.

सर्व्हर
आपल्याकडे सर्व्हर म्हटलं की काहीशा वेगळ्या नजरेने बघितलं जातं. परंतु परदेशात प्रत्येक कामाला समान मान आहे. तिकडे सुट्टीच्या दिवसात अशी कामे करून पैसे कमावण्याचा प्रघात आहे. तेव्हा एखाद्या कामाकडे हीन नजरेने बघण्याचा हा दृष्टीकोन आपण बदलला पाहिजे. त्यासाठी स्वतःचा दृष्टीकोन बदला. पिझ्झा हट, सीसीडी यांसारख्या ठिकाणी सर्व्हर म्हणून तुम्ही सुट्टीच्या दिवसात काम करू शकता. त्यामुळे तुमचं संवाद कौशल्य सुधारेल. आत्मविश्‍वास वाढेल. बुद्धीला चालना मिळेल.

इंटर्नशिप
तुम्ही ज्या क्षेत्राचे शिक्षण घेताय. त्या क्षेत्राच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची ही संधी अजिबात दवडू नका. इंटिरीअर डिजायनर, ग्राफिक डिजायनर, मिडीया इत्यादी ठिकाणी संधी शोधा व कामाला लागा. काही ठिकाणी इंटर्सना पैसे दिले जात नाहीत. पण प्रत्यक्ष कामाचा अनुभव खूप मिळेल. त्यामुळे आत्मविश्‍वास बळावेल. कामाचे स्वरूप लक्षात येईल.

हॉबी क्लासेस
तुमच्याकडे एखादी कला असेल किंवा तुम्ही काही नाविन्यपूर्ण गोष्टी शिकला असाल, तर तुम्ही त्याचे क्लासेस घेऊ शकता. रांगोळी, मेंदी, चित्रकला, मेणबत्त्या बनवणे, पेपर बॅगस् बनवणे, ओरीगॅमी असे हॉबी क्लासेस तुम्ही घेऊ शकता. एकटीला शक्य नसेल तर दोघी-तिघींनी एकत्र येऊन सुरुवात करा.
तसेच केक बनवणे, कॅलिग्रॉफी, नृत्य असे अनेक पर्याय तुमच्याकडे आहेत. पण हे करताना त्यात तुम्ही निपुण असणे गरजेचे आहे. लहान मुलांचे हे क्लासेस घेतल्याने तुम्हाला लहानग्यांशी संवाद कसा साधावा, त्यांना कसे सांभाळावे, शिकवावे हे कळेल. तुमच्याही ज्ञानात-कलेत भर पडेल. आत्मविश्‍वास वाढेल नि चार पैसे हाती येतील.

वर्क फ्रॉम होम
नेट वर सर्च केल्यास वर्क फ्रॉम होम अशी अनेक कामे तुम्हाला मिळतील. डेटा एन्ट्रीची कामे तुम्ही घरबसल्या करू शकता नि सुट्टीत पैसे कमवू शकता.

योगा क्लासेस
तुम्ही योगा टिचर असाल तर तुमच्या कॉलनीच्या टेरेसवर किंवा सोसायटीच्या हॉलमध्ये योगा क्लासेस घेऊ शकता. त्याचबरोबर प्रत्यक्ष घरी जाऊनही पर्सनल ट्रेनर म्हणून काम करू शकता. यातून तुम्हाला चांगले पैसे तर मिळतीलच नि तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. शिवाय तुम्ही मिळवलेल्या ज्ञानाचा सदुपयोग होईल. ज्ञानाची देवाण घेवाण झाल्याने अजून ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा वाढेल.

Share this article