’मी नथुराम गोडसे’ या लोकप्रिय व वादग्रस्त नाटकाचे पुनरागमन झाले असून ते दोन संस्थेमार्फत चालू आहे. त्याच्या हक्कांवरून कोर्टकचेरी झाल्याने शरद पोंक्षे यांनी नाटकाच्या नावात किंचितसा बदल केला व फक्त ५० प्रयोग करण्याची घोषणा केली. त्यांचे हे प्रयोग आता आटोपत चालले आहेत.
कित्येक वर्षांपासून वादग्रस्त असलेले हे नाटक आता पुन्हा नव्या वादात अडकले असले तरी त्यामध्ये नथुराम गोडसे यांची भूमिका करणारे शरद पोंक्षे यांना अभिनेता म्हणून या नाटकाने लोकमान्यता मिळाली. ही भूमिका ते समरसून करतात. मात्र हे नाटक अगदी सुरुवातीला रंगमंचावर यायचे होते तेव्हा ज्येष्ठ अभिनेता डॉ. श्रीराम लागू यांना ती करण्याविषयी विचारणा करण्यात आली होती. पण लागू हे गांधीवादी होते व नाटकातील नथुराम गोडसे यांची विचारधारा न पटल्याने त्यांनी ही भूमिका करण्यास नकार दिला होता. परंतु नाटकाने तुफान यश मिळविल्यावर डॉ. लागू यांनी पुण्याच्या भरत नाट्यमंदिराचा प्रयोग आवर्जुन पाहिला. अगदी पहिल्या रांगेत बसून.
यासंबंधीची त्यांची आठवण शरद पोंक्षे यांनी आपल्या पुस्तकात दिली आहे. एवढा मोठा नटसम्राट आपले नाटक पाहायला आल्याचे पाहून आपल्यावर दडपण आले होते, अशी कबुली देऊन शरद पोंक्षे पुढे म्हणतात की, प्रयोग संपल्यावर मी थिएटरात डॉक्टरांच्या खुर्चीजवळ जाऊन त्यांना भेटलो. तेव्हा ते म्हणाले, “तुम्ही अप्रतिम काम केलं आहे. नाटकाचा पडदा उघडल्यावर पहिली १५ मिनिटे, हाऊस फुल्ल नाट्यगृहात स्वगत म्हणायला जी हिंमत, धारिष्ट्य लागतं, ते तुमच्याकडे जबरदस्त आहे. त्यासाठी मी तुमचं कौतुक करतो. या नाटकाची भाषा जहाल आहे. त्यातील दोन प्रसंग तुम्ही जास्त चिडून बोलता. १-२ प्रयोगात तीच वाक्ये शांतपणे, न चिडता बोललात तर परिणामकारक होईल.”
असा स्तुतीपर उपदेश करून डॉक्टर लागू यांनी पोंक्षे यांना सांगितलं की यापुढे कधीही नाटक, भूमिका कशी करावी या विषयांवर अडचण आली तर माझ्या घराचे दरवाजे तुम्हाला सदैव उघडे आहेत. मला तुमचं काम खूप आवडलं आहे.
एवढं बोलून डॉक्टरांनी पोंक्षे यांना प्रेमाने जवळ घेतलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला.
एका नटसम्राटाची ही स्तुतीसुमने शरद पोंक्षे यांचं मोठं संचित आहे.