विद्या बालन ही बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्याने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांच्या हृदयात तिने हक्काचे स्थान निर्माण केले आहे, यात शंकाच नाही. चाहते तिच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच विद्याचा ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील विद्याच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे. या सगळ्या दरम्यान, अभिनेत्रीने खुलासा केला आहे की, एका चित्रपटात एक पात्र साकारल्यानंतर तिला धूम्रपानाचे प्रचंड व्यसन लागले होते.
'द डर्टी पिक्चर' या सिनेमामुळे विद्या तुफान चर्चेत आलेली, यामध्ये तिने दाक्षिणात्य सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीने साकारलेल्या या बोल्ड भूमिकेची चर्चा तर झालीच, शिवाय तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. हे पात्र साकारण्यासाठी विद्याने काही सवयी तिच्या दररोजच्या आयुष्यातही अवलंबल्या होत्या. 'द डर्टी पिक्चर'नंतर विद्या चक्क धूम्रपान करू लागली होती.
'अनफिल्टर्ड बाय समदिश' या युट्यूबवरील मुलाखतीमध्ये विद्याने तिच्या स्मोकिंगच्या सवयीविषयी सांगितले. यावेळी ती म्हणाली की, ‘चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी मी धूम्रपान केले. मला धुम्रपान कसे करायचे हे माहित होते. परंतु, मी प्रत्यक्षात धूम्रपान करत नव्हते. पण त्या पात्राची गरज म्हणून सतत सिगरेट हातात घ्यावी लागायची. एक पात्र म्हणून, आपण अशा गोष्टी बनावटपणे करू शकत नाही. मला सुरुवातीला संकोच वाटला. कारण, सिगारेट ओढणाऱ्या स्त्रियांबद्दल एक विशिष्ट समज आहे. आता ते कमी झाले असले तरी पूर्वी ते जास्त होते.’
जेव्हा विद्याला विचारण्यात आले की, ती अजूनही धूम्रपान करते का, तेव्हा तिने कबूल केले की, ती आता धूम्रपान करत नाही. यावेळी विद्या म्हणाली की, ‘नाही, मला असं वाटत नाही की, मी कॅमेरावर हे सांगावं. पण, मला स्मोकिंग करायला आवडते. जर, तुम्ही मला सिगारेटचे कोणतेही नुकसान नाही, असे सांगितले असते, तर मी धूम्रपान करणारी बनले असते. मला धुराचा वास आवडतो. अगदी माझ्या कॉलेजच्या दिवसांतही मी धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या शेजारी बसायचे, त्यामुळे मला दिवसातून २-३ सिगारेट ओढण्याचे व्यसन लागले होते.’
विद्या बालनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री 'दो और दो प्यार' या चित्रपटाद्वारे दीर्घ काळानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रतीक गांधी आणि इलियाना डिक्रूझ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'दो और दो प्यार'ला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.