Close

घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं नंतर आणखी एक नवी मालिका, विशाल निकम आणि पुजा बिरारीचं येड लागलं प्रेमाचंमधून कमबॅक (Vishal Nikam And Pooja Birari Comeback In Star Pravhah From New Serial Yed Lagla Premach)

स्टार प्रवाह म्हणजे महाराष्ट्राची पहिली पसंती. स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांना भावतील आणि दैनंदिन आयुष्याचा भाग वाटतील अश्या मालिकेच्या कथा आणि घरातील सदस्य वाटावीत अशी पात्र उभी करुन रसिकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. मनोरंजनाचा हा प्रवाह असाच अखंडित ठेऊन नव्या मालिकांची पर्वणी स्टार प्रवाह वाहिनी घेऊन येत आहे. घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं नंतर स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका येड लागलं प्रेमाचं. माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकतं ते प्रेम. प्रेमात समोरच्याला बदलण्याचा अट्टहास नसतो, जे जसं आहे ते अगदी तसं त्याच्या पूर्ण गुण-दोषांसकट स्वीकारणं म्हणजे प्रेम. येड लागलं प्रेमाचं ही मालिकाही प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणारी असेल. महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुर नगरीत या मालिकेची गोष्ट घडणार आहे. राया आणि मंजिरी या मालिकेतली प्रमुख पात्र. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे येड लागलं प्रेमाचं ही मालिका. दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता विशाल निकम आणि स्वाभिमान मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पुजा बिरारी या मालिकेत राया आणि मंजिरीची भूमिका साकारताना दिसतील.

स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘येड लागलं प्रेमाचं ही मालिका प्रेमामुळे बदलत जाणारी माणसं आणि मानसिक स्थिती यावर भर देत हळुवार भावना उलगडत पुढे जाणारी आहे. प्रेक्षकांना मालिकेत भव्यदिव्य सीक्वेन्स बघायला मिळतील आणि करमणूक प्रधान कथा पुढे सरकत जाईल.’

राया या पात्राविषयी सांगताना अभिनेता विशाल निकम म्हणाला, ‘स्टार प्रवाह माझं कुटुंब आहे. या कुटुंबात पुन्हा एकदा सामील होतोय याचा खूप आनंद आहे. मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आणि हटके असं हे पात्र आहे. खऱ्या आयुष्यातही माझं आणि विठुरायाचं खास नातं आहे. माऊलींच्या आशीर्वादामुळेच इथवरचा प्रवास मी करु शकलो. माझ्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. या मालिकेची गोष्ट देखिल पंढरपुरात घडते. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. पुजा बिरारीसोबत मी पहिल्यांदा काम करतो आहे. पुजा खूप समजूतदार आहे. ती स्वत:पेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करते. माणूस म्हणून ही सर्वात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. पुजाच्या याच स्वभावामुळे आमचे सीन्स खूप छान होत आहेत अशी भावना विशाल निकम याने व्यक्त केली.’

एका छोट्या ब्रेकनंतर पुजा बिरारी देखिल मंजिरी हे पात्र साकारण्यासाठी फारच उत्सुक आहे. मंजिरी या नावातच गोडवा आहे. हाच गोडवा या पात्रात देखिल आहे. विठुराया तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. ‘शुटिंगच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच पंढरपुरात गेले. पण पहिल्यांदा गेलेय असं जाणवलं नाही. पंढरपुराने मला आपलसं केलं आहे असं मला वाटत होतं. पंढरपुरातल्या प्रत्येक गोष्टीत विठुरायाचा वास आहे. शुटिंगच्या निमित्ताने ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. याआधीच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम यापुढेही मिळेल याची मला खात्री आहे अशी भावना पुजा बिरारीने व्यक्त केली.’

विशाल निकम आणि पूजा बिरारीसोबतच मालिकेतून अनेक दिग्गज कलाकार भेटीला येतील. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका येड लागलं प्रेमाचं लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.

Share this article