Close

स्वेच्छा निवृत्ती (Short Story: Voluntary Retirement)

  • रामकृष्ण अघोर

  • पाखरांप्रमाणे मुक्त जीवन जगण्याची रमेशची इच्छा होती. म्हणून त्याने वयाच्या पन्नासाव्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती घ्यावयाचे ठरवले होते. त्याप्रमाणे आज रमेशच्या निवृत्तीचा दिवस होता. रमेश आज विशेष आनंदी होता.

  • रमेश आज सकाळपासून खूप आनंदात होता. त्या दिवशी कधी नाही ते भल्या पहाटे उठला. सकाळचे सर्व कार्यक्रम उरकले आणि सकाळी सकाळी फिरायला गेला. त्या मोकळ्या मैदानात अनेक ज्येष्ठ नागरिक फिरायला येत असत. सकाळचे वातावरण प्रदुषणमुक्त असावयाचे म्हणून स्वतःचे आरोग्य देखील चांगले रहावे यासाठी ते घराबाहेर पडून मोकळ्या जागेत फिरायला येत असत. पण रमेश आज विशेष आनंदी होता, याचे कारण म्हणजे त्याच्या नोकरीचा आज शेवटचा दिवस होता. आज सर्व ज्येष्ठ नागरिकांमधे मिसळून त्यांच्या ओळखीपाळखी करून घेण्यासाठी तो आला होता.
    घरातील वातावरण देखील त्याचप्रकारे आनंदी आणि उत्साही होते. इतके दिवस नोकरीमधे गुंतलेला रमेश आता मुक्त संचार करणार होता. त्याने त्या दिवशीपासून स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतलेला होता. मात्र त्याची पत्नी सीमा हिला रमेश स्वेच्छा निवृत्ती घेत असल्याचा निर्णय मान्य नव्हता. तिने हळूच, गोडीमधे रमेशला स्वेच्छा निवृत्तीचा फेरविचार करावा, असे सांगितले होते.
    पत्नीच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून उलट रमेश सीमाला सांगू लागला. अगं! मला आता स्वेच्छा निवृत्तीनंतर प्राव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी, रजेचे पैसे वगैरे भरपूर येणार आहेत. तेव्हा तुला हवे तसे सोन्याचे दागिने करुन घे, भारीपैकी पैठणी घेऊ. अनेक ठिकाणी प्रवासाला जाऊ. महाबळेश्वर, कुलू मनाली, लोणावळा इत्यादी थंड हवेच्या ठिकाणांना भेटी देऊ. अशा प्रकारे तिची तो समजूत घालू लागला.
    रमेश हा एका बँकेत नोकरीस होता. बँकेमधे वाढते काम, शिपाई लोकांचा असहकार, बँकांच्या कामाचे झालेले संगणकीकरण, बदलून आलेल्या साहेबांची कटकट, तसेच बँकेच्या वेळेपेक्षा रोज दोन दोन तास काम करावे लागे. सुट्टीच्या दिवशी देखील अर्धा दिवस काम करावे लागे. ह्यामुळे रमेश वैतागला होता. नोकरीला कंटाळून अनेक जण व्ही.आर.एस. घेत होते. त्यांच्याकडे पाहून रमेश दुःखी व्हायचा, कारण स्वेच्छा निवृत्ती घेतलेले कर्मचारी आलेली मोठी रक्कम गुंतवून त्याचे व्याज घेत होते. सकाळी फिरायला जाणे, मित्रांबरोबर दिवसभर मजा करणे, फॅॅमिली सोबत सिनेमाला, नाटकाला जाणे इत्यादी गोष्टीत ते वेळ व्यतित करत होते.
    अशा प्रकारचे पाखरांप्रमाणे मुक्त जीवन जगण्याची रमेशची इच्छा होती. म्हणून त्याने वयाच्या पन्नासाव्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती घ्यावयाचे ठरवले होते. त्याप्रमाणे आज रमेशच्या निवृत्तीचा दिवस होता. स्वेच्छा निवृत्तीच्या नंतरच्या पहिल्याच दिवशी रमेश सकाळी सात वाजता उठला. त्याची बायको सीमा त्याला पहाटे पाच वाजल्यापासून फिरायला जाण्यासाठी उठवत होती. पण रमेश काही केल्या उठण्याच्या तयारीत नव्हता. उलट तो पांघरूण डोक्यापर्यंत ओढून ओढून झोपत होता. अंथरुणावरून उठल्या उठल्या बेड टीची मागणी करू लागला.
    तेव्हा सीमाने तसले फाजिल लाड बंद करून, मोठ्या धाडसाने सकाळी सकाळी रमेशला तोंड धुऊन चहा पिण्याची आज्ञा केली. रमेश स्वेच्छा निवृत्तीनंतर वरचेवर आळशी होऊ लागला. नेहमी भराभरा करावयाची कामे तो सावकाशपणे करु लागला.

  • थोड्याच दिवसात भविष्यनिर्वाह निधीची आणि ग्रॅज्युएटीची मोठी रक्कम रमेशच्या खात्यावर जमा झाली. एवढी रक्कम त्याने प्रथमच पाहिली होती. फक्त पाच आकडी पगार घेण्याव्यतिरिक्त त्याला काहीच माहीत नव्हते.
    मोठी रक्कम आल्याबरोबर रमेश सीमाला आणि मुलांना, एक मुलगा व एक मुलगी ह्यांना देखील घेऊन महाबळेश्वरला गेला. तेथे चांगल्या फाईव्ह स्टार हॉटेलात एक आठवडा मुक्काम करुन राहिला. भरपूर गंमत जंमत करुन परत घरी आला. मुलामुलीने प्रवासाचा भरपूर आस्वाद घेतला. पण ही गंमत जंमत रमेशची पत्नी सीमाला आवडली नाही. कारण नवर्‍याने अशा प्रकारे पैसा उधळलेला तिला आवडले नाही. ती खूप काटकसरी होती. मिळालेल्या पैशातून काटकसर करुन चार पैसे शिल्लक टाकणार्‍यांपैकी ती होती.
    सीमाच्या आई वडिलांनी देखील रमेशला म्हणजे जावयाला समजावून सांगितले. अजून एक मुलगा ग्रॅज्युएट झाला आहे. त्याला अद्याप नोकरी नाही. त्याच्या नोकरीसाठी मुलाखतीला जाण्यासाठी पैसा शिल्लक राहू द्या. मुलीचे अद्याप लग्न व्हायचे आहे. ती बी.एस.सी.च्या शेवटच्या वर्षाला होती. तिच्यासाठी मोठ्या रकमेची तरतूद करण्याची गरज आहे. ह्या सासू व सासरे यांच्या सल्ल्यामुळे रमेशचा अहंकार दुखावला गेला. त्याने सासू सासर्‍यांशी बोलणे बंद केले. तेव्हापासून सीमाच्या आई-वडिलांचे येणे बंद झाले.
    रमेश ज्या अपार्टमेंटमधे राहत होता, त्या अपार्टमेंटमधे रमेशनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याबद्दल चर्चा सुरू झाली असून आठ, दहा वर्षे असताना नोकरी सोडून घरी बसल्याने त्याची टिंगल करू लागले. ही गोष्ट जेव्हा रमेशच्या कानावर गेली, तेव्हा आपल्या अपार्टमेंटमधील सभासदांशी भांडून त्याने कायमचे वैमनस्य घेतले.
    रमेशजवळ निवृत्तीमुळे मोठी रक्कम असल्याने मतलबी नातेवाईक त्याच्याजवळ येऊ लागले. गोडगोड बोलू लागले. काही अडचणीसाठी वीस पंचवीस हजाराची मागणी करू लागले. परत देणार ह्या अटीवर रमेश सगळ्यांनाच आर्थिक मदत देऊ लागला. त्याचप्रमाणे बँकेमधील मतलबी कर्मचारी आणि उमेशचे मित्र यांच्यासोबत सातत्याने रात्रीच्या बैठका होऊन खाणे पिणे व्यवस्थित सुरू होते. अशा रितीने घरात दिलेली कोणतीच आश्वासने पूर्ण न करता त्याची गंगाजळी हळूहळू संपुष्टात येऊ लागली.
    अजून मुलीचे लग्न बाकी होते. तिचे शिक्षण पूर्ण झालेले होते. कोठे वर पसंत पडेना. जेथे पसंत म्हणून निर्णय येऊ लागला, तेथे हुंडा व इतर मागणी भरपूर करू लागले. तेवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची रमेशची कुवत नव्हती. साहजिकच रमेश व रमेशची पत्नी सीमा, त्याचा मुलगा व मुलगी सतत घरातच असायचे. रमेशची पत्नी हिला नोकरी करून पगार मिळवायचा अशी तिची तीव्र इच्छा होती. रमेशशी विवाह करण्यापूर्वी ती शिक्षिका म्हणून नोकरीस होती. पण रमेश बँकेत नोकरीस होता. त्याला भरपूर पगार होता. म्हणून रमेशनी सीमाला नोकरी सोडण्यास सांगितले. भविष्यात रमेशला स्वेच्छा निवृत्तीमुळे सर्व नातेवाईक, जवळचे रहाणारे लोक दुरावले होते, कारण रमेशनी त्यांना दुखावले होते. रमेश स्वेच्छा निवृत्ती घेऊन घरी बसल्यावर बरेच काही करावयाचे ठरवले होते. संपूर्ण भारत देशातील प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार होता. मुलाला पुण्याला नोकरी लागल्यावर तेथे त्याला फ्लॅट घेऊन देणार होता. मुलीला पुण्यातले स्थळ पाहून तेथेच लग्न लावून देणार होता आणि नंतर रमेश आणि सीमा हे दोघेही पुण्यातच राहण्याचा विचार करत होते. पण ह्यातले काहीच घडले नाही. उलट राहणीमानाचा दर्जा घसरला. ह्या गोष्टीचे सीमाला दुःख झाले. सर्व परिस्थितीवर विचार करून करून सीमाचे डोके फुटायची वेळ आली. काय करावे काही सुचेनासे झाले.
    दुसरे दिवशी सीमा सकाळी उठली. तिला एकाएकी उत्साह वाटू लागला. ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे असा विचार तिच्या मनात आला. पूर्वी ज्या शाळेमधे ती शिक्षिका होती. त्या शाळेमधे नोकरी विचारण्यासाठी गेली. पण कोणताच विषय शिकविण्यासाठी शिक्षकाची जागा रिकामी नव्हती. मात्र त्या शाळेने कॉम्प्युटरचा विषय मुलांसाठी नव्याने ठेवला होता. ती मध्यंतरी कॉम्प्युटर शिकण्यासाठी जात होती. त्यामुळे तिला कॉम्प्युटरचे ज्ञान बर्‍याच प्रमाणात होते. त्या शाळेत मुलांना कॉम्प्युटर शिकविण्यासाठी एका शिक्षिकेची गरज होती. तेथील मुख्याध्यापकांनी सीमाला कॉम्प्युटर शिकविण्यासाठी ऑफर दिली. तिने लगेच त्यासाठी होकार दिला.
    इकडे रमेश वरचेवर आळशी होत चालला. मित्राच्या सहवासामुळे रोज संध्याकाळी पिण्याची सवय लागली. तो दारुच्या व्यसनात पूर्णपणे व्यसनाधीन झाला.
    एके दिवशी त्याला आजारपण आले. तो तापाने फणफणू लागला. म्हणून सीमाने त्याच्यासाठी रिक्षा करुन दवाखान्यात डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी त्याला पूर्णपणे तपासले. नंतर रमेशचे रिपोर्ट पाहिले, तेव्हा त्याला डायबेटिस आणि ब्लडप्रेशर झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच रमेशचे लिव्हर खराब होण्याच्या मार्गावर आले होते.
    डॉक्टरांनी रमेशला एका हॉस्पिटलमधे भरती करून घेण्यास सांगितले. तेथे सलाईन, इंजेक्शन, गोळ्या, औषधे असे उपचार सुरु झाले. खाण्यापिण्यावर बंधने आली. योग्य वेळी उपचार झाल्याने अल्पावधीतच रमेश आजारपणातून बाहेर आला. सीमा ने त्याला पौष्टिक पदार्थ करुन घातले. त्यामुळे त्याची तब्बेत सुधारली.

  • घरी बसून वेळ जाईना. मित्र मंडळी येणे, भेटणे बंद झाले. शिवाय रमेशला वाचण्याचा, काहीतरी लिहिण्याचा नाद नव्हता. आपल्या अपार्टमेंटच्या सभोवताली एक गार्डन होतं. अनेक जण त्या बागेमधे काहीना काही तरी उद्योग करत. नविन रोप लावणे, वाळलेली रोपे काढणे, मधेमधे उगवलेले गवत काढणे, रोपाला पाणी घालणे, इत्यादी कामे त्या अपार्टमेंटचे सभासद करत असत. पण त्यात देखील रमेशला उत्साह नव्हता. तो घरात एकाकी पडून राही.
    इकडे सीमाची नोकरी उत्तमरितीने चालली होती. तिला घरातील मुलभूत गरजा भागतील एवढा पगार महिन्याला मिळत होता. तेथील एका शिक्षिकेच्या ओळखीने तिने आपल्या मुलाला एका चांगल्या कंपनीत नोकरीस लावले. पुढील शिक्षण घेण्यासाठी सीमाने आपल्या मुलीला देखील पुण्याला पाठवून दिले. तिथे भाड्याने छोटेसे घर घेऊन भाऊ व बहीण पुण्याला एकत्रितरित्या राहू लागले. बहिण असल्याने घरातच स्वयंपाक करुन ती भावाला जेवायला वाढू लागली तसेच कामावर जाताना डबा भरुन देऊ लागली. साहजिकच दोघांनाही एकमेकापासून सहकार्य व संरक्षण मिळू लागले. काही महिन्यात सीमाचा मुलगा प्रमोशनवर गेला आणि त्याला चांगला पगार मिळू लागला. त्या मुलाच्या ऑफीसमधील एक कर्मचारी त्याच्याकडे आला असताना त्याने सीमाच्या मुलीला पाहिले आणि मुलीला मागणी घातली. त्या मुलाने ही गोष्ट आपल्या आई वडिलांना म्हणजे रमेश व सीमाला कळवले. ती दोघेही उभयंता पुण्याला येऊन दाखल झाले. त्यांनी त्या मुलाच्या आई-वडिलांची, त्यांच्या राहणीमानाची माहिती घेतली. तो उपवर मुलगा सीमाच्या मुलाच्या ऑफिसात नोकरीस असल्याने त्यांना त्याची पूर्ण माहिती मिळाली. तो मुलगा एकदम मध्यमवर्गीय होता. कोणत्याच प्रकारचा म्हणजे हुंडा, वरदक्षिणा न घेता साध्या पध्दतीने विवाह केला.
    रमेश व सीमा परत आपल्या गावी आले. मुलाच्या आग्रहाखातर दोघांनीही आपले गाव सोडले, पुण्याला एक फ्लॅट खरेदी केला. तेथे एक कॉम्प्युटर विकत घेऊन सीमाने रमेशला सर्व प्रकारचे कॉम्प्युटरचे ज्ञान दिले. त्याला देखील कॉम्प्युटर हाताळता येऊ लागला. पुण्याला अनेक कंपन्यांची कामे करुन देऊन पैसे मिळवू लागला. अखेर सीमाने त्याला कामास लावले. पुढे मुलाचा विवाह देखील धुमधडाक्यात पार पडला.
    रमेशचा वेळ आता पूर्णपणे कामात जाऊ लागला. त्याला इकडे तिकडे विनाकारण हिंडण्यास वेळ मिळेना. त्याला पश्चाताप झाला. मी स्वेच्छा निवृत्ती घेतल्यामुळे किती समस्या उपस्थित झाल्या. यापुढे कोणत्याही कारणासाठी, कोणत्या परिस्थितीत स्वेच्छा निवृत्ती घ्यायची नाही. शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहावयाचे अशी रमेशनी प्रतिज्ञा केली.

Share this article