Close

साखरेला पर्याय काय? (What Is The Substitute For Sugar?)

आनंद साजरा करायचा तर तोंड गोड करणं आलंच. परंतु, गोडाचं खाण्याचा विचार करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण साखर ही आरोग्यास विषसमान आहे. मग प्रश्‍न असा आहे की, साखर नाही खायची तर साखरेची तल्लफ कशानं भागवायची? घाबरू नका, साखरेलाही अतिशय गोड असे हेल्दी पर्याय आहेत.


आपल्याकडे म्हण आहे की, गोड खाणार, त्याला देव देणार. पण तो गोडपणा जर साखरेचा असेल, तर मात्र आपल्याला आरोग्याच्या दृष्टीनं सांभाळायला हवं. साखरेचं अति प्रमाणात सेवन म्हणजे आजारांना निमंत्रण, असं म्हणावं लागेल. साखरेमध्ये कुठल्याही प्रकारची पोषक तत्त्वं नसतात. शिवाय साखर बनवताना जी रासायनिक प्रक्रिया केली जाते, त्या प्रक्रियेमध्ये त्यातील सर्व पौष्टिकता नष्ट होते आणि केवळ कॅलरीज शिल्लक राहतात. एका संशोधनात असंही दिसून आलं आहे की, साखर किंवा गोड खाण्याची सवय ही मद्यपान आणि धूम्रपानासारखं एक व्यसन आहे. तेव्हा वेळीच साखरेचे दुष्परिणाम लक्षात घेऊन आपण त्याची सवय सोडायला हवी. खरं म्हणजे, साखरेशिवाय आपलं काहीही अडणार नाहीये, कारण आपल्याकडे साखरेसाठी अनेक निरोगी पर्याय उपलब्ध आहेत.

साखरेला पर्यायी पदार्थ
खजूर
खजुरामध्ये एक नैसर्गिक गोडवा आहे आणि हे पोषक तत्त्वांनी भरलेलं आहे.
साखरेऐवजी आपण खजुराचा वापर करू शकतो, कारण यात पोटॅशिअम, जीवनसत्त्व ब6 आणि कॅल्शियम असतं.
खजूर आपली साखरेची तल्लफ सहज कमी करू शकतो. तसंच यात लोहाचं प्रमाण अधिक असल्यानं, त्यापासून आपणास ताकदही मिळते.
जेवणानंतर ज्यांना गोड खाण्याची सवय आहे, त्यांनी खजूर खावं.
ब्राऊन शुगरलाही हा चांगला पर्याय आहे.
मिल्कशेक, दही, बेकिंग, शुगर-फ्री खीर, केक, पुडिंग इत्यादींमध्ये साखरेऐवजी खजुराचा वापर करा.

गूळ
उसापासून बनवण्यात येणारा गूळ साखरेपेक्षा अधिक सकस आहे. साखरेप्रमाणे त्यास रिफायनिंगच्या प्रक्रियेतून जावं लागत नसल्यामुळे त्यातील पोषण मूल्यं कायम राहतात. मात्र गुळाचंही अधिक प्रमाणातील सेवन घातक ठरू शकतं.
गूळ शरीराची स्वच्छताही राखतो.
गुळामुळे पचनक्रिया सुधारते. चहामध्ये साखरेऐवजी गूळ घालणं हितावह ठरतं.
गुळातील कार्बोहायड्रेट्स आणि फायबर त्यास एक स्वास्थ्यवर्धक गोडवा देतात.

मध
मधामध्ये जीवाणूनाशक, अँटी-ऑक्सिडंट आणि कवकरोधी असे गुण असतात.
नैसर्गिक गोडवा असणार्‍या इतर कोणत्याही पदार्थांच्या तुलनेत मध अधिक सरस आहे.
चहा, दूध, लिंबाचं सरबत यामध्ये साखरेऐवजी मधाचा वापर करता येऊ शकतो.
साखरेनं वजन वाढतं. तेच मध वजन आटोक्यात ठेवतं.

उसाचा रस
उसाच्या रसावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया केली जात नसल्याने त्यातील जीवनसत्त्व ब आणि क, कॅल्शियम, लोह आणि मँगनीज नष्ट होत नाहीत.
उष्णतेच्या दिवसातही उसाचा रस प्याल्यास ऊर्जा मिळते.

फळं
फळांचं मिल्कशेक किंवा सरबत बनवायचं असल्यास त्यात साखर घालावी लागत नाही. कारण फळांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो.
फळांपासून वेगवेगळे मिष्टान्न बनवण्यात येतात, त्यातही साखर घालावी लागत नाही.
द्राक्षं स्वतःच ग्लुकोजचा चांगला स्रोत असतात.

कोकोनट शुगर
नारळाच्या झाडाच्या कळ्यांतून निघणार्‍या रसापासून ही साखर बनवली जाते. तिला कोकोनट पाम शुगर असंही म्हटलं जातं.
ही करड्या रंगाची असते आणि यात पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम, लोह असतं.
ही साखर बहुत करून केक, पुडिंग इत्यादी बेकरीचे पदार्थ बनवण्यासाठी वापरतात.

साखर का खाऊ नये?
साखरेचं अतिरिक्त प्रमाण रोगप्रतिकार प्रणालीवर परिणाम करतं.
साखर पचवण्यासाठी शरीराला अधिक कष्ट घ्यावे लागतात.
जास्त गोड खाल्ल्यानं वजन
तर वाढतंच, शिवाय मधुमेह-2 आणि उच्च रक्तदाब यासारखा आजारही जडण्याची शक्यता
निर्माण होते.
जास्तीच्या गोडाने मेंदूवर परिणाम
होऊन आपली स्मरणशक्ती कमजोर होऊ शकते.
साखरेमुळे शरीरामध्ये अतिरिक्त इंसुलिन तयार होतं, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा होऊन हृदयाचा झटका येण्याचा संभव असतो.

Share this article