Close

हिवाळ्यातील आहार-विहार (Winter Foraging)

थंडीच्या दिवसात वातावरण आल्हाददायक असल्यामुळे अंगात उत्साह असतो. पण आरोग्याकडे दुर्लक्ष केलं, तर प्रकृतीच्या कुरबुरी निर्माण होऊन या शीत ऋतूचा आनंद घेता येणार नाही.
डिसेंबर म्हणजे थंडीचा महिना. या दिवसांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब या राज्यांत तर कडाक्याची थंडी पडलेली असते. रंगीबेरंगी स्वेटर्स, कानटोप्या, मफलर्स घालून लोक या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. गरम वाफांची जागा गारेगार वार्‍यांनी घेतल्यामुळे गरगर फिरणारे पंखे आणि ए.सी. यांना विश्रांती दिली जाते. नकोशा झालेल्या ऑक्टोबर हिटनंतर आलेली ही थंडी प्रत्येकालाच हवीहवीशी वाटत असते. बंद पेटीमधून जाड चादरी, रजया, ब्लँकेट्स, गोधड्या बाहेर येतात. अशी ही थंडी सुखद असते… रोमँटिक असते… उत्साहवर्धक असते नि सकाळी अंथरुणातून बाहेर पडण्यापुरती आळसावलेलीही असते. डोक्यावर पांघरूण घेऊन झोपल्यानंतर सकाळी त्यातून बाहेर पडूच नये, असा अनुभव देणारी असते.
दादा कोंडके यांच्या चित्रपटात ‘आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा, मला लागलाय खोकला…’ असं एक गाणं आहे. त्यानुसार शेकोटी आणि खोकला यांचा हा महिना असतो, असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक, मनमाड, जळगाव, औरंगाबाद, सातारा अशा काही शहरांमध्ये थंडीचा कडाका भयंकर असतो. शहरांमध्ये अभावाने दिसली, तरी गावांत मात्र शेकोटी पेटवून, थंडीवर मात करण्यासाठी तिची धग हमखास घेतली जाते. खरं म्हणजे, ही शेकोटी आपल्या पोटात पेटविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अर्थात, थंडीच्या मौसमात शरीरास उष्णता देणारे पौष्टिक पदार्थ आवर्जून खावेत. अशीही या दिवसांत भूक जरा जास्तच लागते. ती शमविण्यासाठी पोटपूजा व्यवस्थित करावी.

हिवाळा स्पेशल पोटपूजा
वाफाळणारा चहा हा तर मस्ट आहे. त्याचप्रमाणे गरमागरम सूपही प्यायला हवे. गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, तिळाची चटणी, खजूर हे उष्ण प्रकृतीचे पदार्थही आवर्जून खावेत. बाजरीच्या भाकरीवर तीळ लावून खावी. त्यामुळे शरीरास स्निग्धता मिळते. शरीरात ऊब निर्माण व्हावी, म्हणून आहारातून मिळणारा स्निग्धांश महत्त्वाचा असतो. तूप, लोणी, चीझ या पदार्थांमधून हा स्निग्धांश मिळतो. म्हणून या पदार्थांचा समावेश खाद्यपदार्थांमध्ये अवश्य करा.
जुनी माणसे हिवाळ्यामध्ये डिंकाचे व मेथीचे लाडू न चुकता तयार करत.
अन् घरातील सगळ्यांना खायला देत. तुमच्याकडे हे केले जात नसतील, तर यंदा अवश्य करा. करता येत नसल्यास किंवा करण्यासाठी वेळ नसल्यास दुकानांमधून असे तयार लाडू विकत आणण्याचा पर्याय आहेच. मात्र चांगल्या दर्जाच्या, खात्रीच्या दुकानातून हे लाडू घ्या, म्हणजे झाले. गरमागरम गाजराचा हलवा आणि बदामाचा शिरा हे तर थंडीत खायलाच हवेत. लसूण व आले उष्णतावर्धक असल्यामुळे त्यांचा अधिकाधिक वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये करावा. आले पचनक्रिया सुधारण्यास उपयुक्त ठरते. गुजराथी लोकांचा आवडता उंधियोही या दिवसात आवर्जून खावा. त्यामध्ये विविध भाज्या, गूळ, माफक प्रमाणात तेल असल्यामुळे, ते शरीरात उष्णता निर्माण करण्यास उपयुक्त ठरते.

मध, खजूर, सुकामेवा खा
मध हे बर्‍यापैकी उष्ण आहे. ते चवीला चांगले तर आहेच, सोबत सहज उपलब्ध होते आणि वापरासही सोपे असते. त्यामुळे हिवाळ्यात मधाचा जास्तीत जास्त वापर करावा. मधात नैसर्गिक गोडवा असल्यामुळे गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी मधाचा वापर करता येईल. म्हणजे आपसूकच हा उष्ण पदार्थ पोटात जाऊन शरीरात ऊब राहील आणि ऊर्जा निर्माण होईल. त्याचप्रमाणे खजूर हाही उष्ण, पौष्टिक आणि चवीला चांगला असल्यामुळे नित्यनेमाने खावा. अगदी जाता-येता तोंडात टाकायलाही हरकत नाही. तसेच ड्रायफ्रुट्सही खावेत. मध, खजूर, सुकामेवा हे शरीरास पोषक पदार्थ आहेत. मात्र या दिवसांत दही, आंबट ताक, फ्रीजमधील गार पाणी इत्यादी कटाक्षाने टाळावे.
हिवाळा हा फळांचाही हंगाम असतो. सफरचंद, द्राक्षे, मोसंबी, संत्री, डाळिंब, सीताफळ, आवळा, पपई, पेरू, लिची अशी फळे या हंगामात मुबलक प्रमाणात मिळतात. प्रत्येक फळात जीवनसत्त्वे असतात. प्रत्येक फळाची चव वेगळी असते, त्यामुळे फळांचे ज्यूस किंवा अख्खी फळे खाऊन रसनाही तृप्त होईल नि शरीरास पोषणतत्त्वेही मिळतील.

विकारांचा ऋतू
हिवाळ्यातील थंडी सुखद, खादाडीची आणि हवीहवीशी असली, तरी आरोग्याच्या तक्रारी निर्माण करणारीही असते. या दिवसांत त्वचा, ओठ, केस कोरडे पडणे, केसांत कोंडा व खाज येणे, हे बिघाड उद्भवतात. शिवाय सर्दी, खोकला,
कफ यांसारखे विकारही हमखास डोके
वर काढतात. त्यांच्यावर मात करायची असेल, तर स्वतःची थोडीफार काळजी अवश्य घ्या.
सर्वप्रथम, थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, शाल, मफलर यांचा वापर करा. आवडत नाही किंवा चांगलं दिसत नाही, म्हणून यांचा वापर टाळू नका. सर्दी, खोकला, पडसे आणि कफ या विकारांना प्रतिबंध करणार्‍या या प्राथमिक गोष्टी आहेत. कडाक्याची थंडी असणार्‍या प्रदेशात दिवसाढवळ्याही स्वेटर, मफलर, शाल वापरणारे लोक आपल्याला दिसतात. या दिवसांत जमिनीवर झोपू नका. अगदीच नाइलाज असल्यास चांगले उबदार अंथरूण घालून त्यावर झोपा. अन् दुलई, रजई यांचे पांघरूण घ्या. घरात वावरताना स्लिपर्स किंवा सपाता घाला. आजारी पडल्यावर उपचारांचा प्रपंच करण्यापेक्षा ते होऊ नयेत यासाठी या प्रतिबंधात्मक योजनांचा अवलंब करा.
थंडीची बाधा जास्त करून लहान मुले आणि वृद्धांना होते. त्यामुळे त्यांची काळजी घेतली पाहिजे. वृद्धांनी फिरण्याचा व इतर व्यायाम अवश्य करावा. तसेच योग, प्राणायाम, ध्यानधारणाही आवर्जून करावी. हातापायांच्या हालचाली अवश्य कराव्या. सकाळी अंघोळीपूर्वी संपूर्ण अंगाला तिळाचे तेल लावून मालीश करावे. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात 10 मिनिटांकरिता पाय बुडवून बसावे. नंतर पाय स्वच्छ पुसून अंथरुणात शिरावे. या दिवसांत जाड चादर, रजई, दुलई पांघरण्यास विसरू नका.
वृद्धांचे संधिवाताचे दुखणे या दिवसांत डोके वर काढते. त्यावर साधा उपाय म्हणजे, सांध्यांना गरम पाण्याचा शेक द्या. खोबरेल तेल लावून शेक घ्यायलाही हरकत नाही. स्वेटर, मफलर, कानटोपी, स्लिपर्स, मोजे यांचा वापर करा. लेखाच्या सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे उष्ण प्रकृतीच्या पदार्थांचा आहारात समावेश करा, पण जरा बेतानेच. रोज तुळशीचे पाने आणि गवती चहा उकळून त्याचे गरम गरम पाणी प्या. जेवतानाही गरम पाणी प्या.

त्वचेचीही काळजी घ्या
बाहेरच्या गारव्याचा परिणाम होऊन सर्वच वयोगटातील लोकांची त्वचा या दिवसांत कोरडी पडते. त्यावर उपाय म्हणून मॉश्‍चरायझर, कोल्ड क्रीम्सचा वापर हमखास होतो. मात्र त्यांचा दर्जा, गुणवत्ता पाहून वापर करा. सोपा उपाय म्हणजे, अंघोळीपूर्वी अंगाला खोबरेल तेल लावा. दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला अंगाला तेल लावण्याचा प्रघात आहे, तो यासाठीच.
या दिवसांत थंडीमुळे ओठ फाटण्याची समस्या हमखास उद्भवते. मग ओठांना क्रीम लावणे, लिप बाम लावणे हा सध्याचा ट्रेण्ड आहे. आपले ओठ हे सौंदर्यस्थळ असल्यामुळे आणि अतिशय नाजूक असल्यामुळे ही क्रीम्स आणि बाम दर्जेदार व नामांकित कंपनीची असतील याची काळजी घ्या. मात्र सगळ्यात सोपा उपाय म्हणजे, फाटलेल्या ओठांवर तूप लावा. ओठ लगेच नरम पडतील. त्यावरील भेगा बुजतील. गालांनाही असेच तूप लावल्यास आराम मिळतो.
थंडीच्या दिवसात वातावरण आल्हाददायक असल्यामुळे अंगात उत्साह असतो. पण आरोग्याकडे दुर्लक्ष केलं, तर प्रकृतीच्या कुरबुरी निर्माण होऊन या शीत ऋतूचा आनंद घेता येणार नाही. वर्षातून एकदाच येणार्‍या या आल्हाददायक ऋतूची
मौज मनापासून अनुभवण्यासाठीआहार-विहाराकडे अवश्य लक्ष द्या.

Share this article