Close

चक दे सिनेमामध्ये होत्या १६ अभिनेत्री; प्रत्येकीच्या पिरियड्‌सबद्दलची माहिती असायची निर्मात्याकडे…यामागचं कारण वाचून व्हाल हैराण (YRF made sure that Chak De India’s women didn’t have to shoot running scenes during periods)

शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला चक दे इंडिया हा सिनेमा खेळांवर आधारित चित्रपटांच्या यादीत सर्वोत्तम मानला जातो. या सिनेमातील संवाद अजूनही बोलले जातात. एवढेच नव्हे तर या चित्रपटांतील नायिकांनादेखील चक दे गर्ल्सच्या नावाने ओळखलं जातं. यावरून हा चित्रपट किती आयकॉनिक झाला होता याची कल्पना येते. यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आलेला हा चित्रपट पाहताना आपल्याला जितकं चांगलं वाटतं तितक्याच चांगल्या पद्धतीने यामधील अभिनेत्रींनी अभिनय केलेला आहे. चित्रपटाच्या शुटींग दरम्यानच्या आठवणींना उजाळा देत विद्या मालवदे हिने यश राज फिल्म्सने सर्व महिला कलाकारांची कशी बडदास्त ठेवली होती, याबाबत सांगितले.

चक दे इंडिया हा चित्रपट खेळ या मध्यवर्ती कल्पनेवर आधारीत असल्याने यातील कलाकारांना शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे गरजेचे होते. विद्याने सांगितले की, शुटिंग दरम्यान कोणत्याही अभिनेत्रीस त्रास होऊ नये हे पाहण्यासाठी एका व्यक्तीला ठेवण्यात आले होते, जी आम्हा मुलींच्या मासिक पाळीच्या तारखांबाबतही माहिती ठेवत असे. अशावेळी आम्हाला आराम मिळावा तसेच धावण्याचे सीन्स करायला लागू नयेत यासाठी हे सगळं केलं जात होतं. त्यावेळेस मग इतर कोणताही सीन शूट केला जायचा.

मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विद्याने सांगितले की या सगळ्याचं श्रेय यशराज यांनाच द्यायला हवं कारण आम्ही १६ जणी होतो आणि आम्हाला सांभाळणे एवढं सोपं नव्हतं. आमच्यासाठी एक मावशींना ठेवलं होतं ज्यांना आमच्या पिरियड्‌सबद्दल माहिती होती. त्यामुळे आम्हाला त्या पिरियडमध्ये आराम मिळायचा. धावण्याचे, उड्या मारण्याचे सीन दिले जात नसत. पुढे तिनं असंही सांगितलं की आम्हा १६ जणींमध्ये अशाही काही मुली होत्या ज्यांनी पूर्वी कधीच शुटिंग केलेलं नव्हतं. परंतु त्यांनीही कोणत्याही दडपणाशिवाय येथे काम केलं.

चक दे इंडिया हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये शाहरुख खान सोबत विद्या मालवदे, सागरिका घाटगे, चित्राशी रावत, तान्या अबरोल, अनायता नायर, शुभी मेहता, शिल्पा शुक्ला यांसारखे अनेक कलाकार होते.

Share this article