भारतीय भूमीवर खेळल्या जाणाऱ्या ICC विश्वचषक २०२३ ट्रॉफीचे अवकाशात अनावरण करण्यात आले आहे. विश्वचषक बीसीसीआय सचिव जय शाह यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. शाह यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ट्रॉफी लॉन्च होताना दिसत आहे.
ICC विश्वचषक २०२३ ची ट्रॉफी अवकाशात सोडण्यात आली आहे. कोणत्याही खेळाच्या इतिहासात अशा प्रकारे ट्रॉफी अवकाशात पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. जमिनीपासून १,२०,००० फूट उंचीवरून या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले आहे. यासोबतच व्हिडिओनुसार, ट्रॉफी उणे ६५ अंश तापमानात लॉन्च करण्यात आली आहे. व्हिडिओच्या शेवटी ट्रॉफी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर उतरताना दिसत आहे. सोशल मीडियावर ट्रॉफीचे हे अनोखे अनावरण चाहत्यांना खूप आवडले आहे.
वर्ल्डकप ट्रॉफी वर्ल्ड टूरवर जाणार
आयसीसी विश्वचषक ट्रॉफी आता जगाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ट्रॉफी २७ जून ते १४ जुलै दरम्यान भारतात असेल. यानंतर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पीएनजी, वेस्ट इंडिज, पाकिस्तानसह एकूण १८ देशांचा दौरा करणार आहे. यानंतर ४ सप्टेंबर रोजी वर्ल्डकप ट्रॉफी भारतात परत येणार आहे.