अलिबागचे मनमोहक सागरी किनारे, निसर्ग सौन्दर्याची मोहिनी कुणाला न पडावी तर नवल… सिनेसृष्टीचे आघाडीचा अभिनेता रणवीर सिंगला देखील अलिबागची चांगलीच भुरळ पडली आहे. रणवीर सिंगने अलिबागमध्ये येऊन आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. अलिबागचे माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांच्या सातीर्जे येथील निवासस्थनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्याने गावातील तरुणांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. रणबीरचे आगमन होताच ठाकूर कुटुंबियांकडून त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्राची ठाकूर आणि कटुंबातील महिलांनी त्याचे औक्षण केले.
यावेळी स्व. मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव तथा रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, त्यांचे मोठे बंधू रवी उर्फ नाना ठाकूर, मालती ठाकूर, मीनाक्षी ठाकूर, कळल ठाकूर आणि ठाकूर परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. राजाभाऊ ठाकूर यांचे थोरले बंधू ॲड. प्रवीण ठाकूर यांची मुलगी धनश्री ठाकूर हिच्या वाढदिवसानिमित्ताने यावेळी केक कापण्यात आला.
त्या आनंदातही रणबीर सहभागी झाला. एक आघाडीचा अभिनेता असूनही त्याचे वावरणे हे सर्वांना आपलेसे करणारे होते. सर्वांबरोबर हास्य विनोदात काही क्षण रमल्यानंतर रणबीरला क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. गावातील मुलांसोबत त्याने क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी त्याने उत्तम फलंदाजी केली. अभिनयासोबत तो चांगला क्रिकेट खेळतो, हेदेखील त्याने दाखवून दिले.
दरम्यान, रणवीर सिंग नेहमीच अलिबागला येत असतो. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या फेमस दाम्पत्याने ९० गुंठे जागा २२ कोटीला खरेदी केली आहे. रणवीर आणि दीपिकाच्या या जागेत २ बंगले असून नारळ, सुपारीची मोठी बाग देखील आहे.