आपल्या वास्तूमध्ये शयनगृह (बेडरुम)चे देखील अतिशय महत्त्वाचे स्थान असते. दिवसभर आपल्या कामधंद्यातून दमून-भागून घरी आल्यानंतर आपल्या शरीराला विश्रांतीची गरज असते. आपल्या शरीराला विश्रांतीमुळे नवीन ऊर्जा प्राप्त होते, ज्यामुळे आपण दुसर्या दिवशी पुन्हा नवीन दिवसाची सुरुवात आनंदाने करतो. शांत झोप मिळाली की मन प्रसन्न राहते. आपला दिवसही चांगला जातो. ह्यासाठी शयनगृहाचे काही नियम आपल्याला कटाक्षाने पाळावे लागतात. कारण चुकीच्या पद्धतीने झोपल्यास किंवा शयनकक्षात काही त्रुटी असल्यास त्याचे परिणाम थेट आपल्या तब्येतीवर होतात.

- पती-पत्नीचे शयनगृह नैऋत्येला असावे.
- मुलांसाठी शयनगृह पश्चिमेला असावे.
- शयनगृहाला भडक रंग असून नये.
- शयनगृहात लाल रंग टाळावा, शक्यतो गुलाबी रंग असावा.
- शयनगृहात राधा-कृष्ण, शिव-पार्वती, लव्हबर्ड्स, अजंठा-वेरूळ लेण्यातील शिल्पांसारखी शिल्पे असावीत.
- शयनगृहात जोडप्यांसाठी वेगवेगळे पलंग असू नयेत. ते जोडून घ्यावेत व त्यावर एकच बेडशीट घालावी.
- शयनगृहात 3-3 वस्तू वा 3-3 फोटो असू नयेत. कोणत्याही वस्तू जोडीने 2-2 असणे लाभदायक ठरते.
- शयनगृहावर प्रखर उजेड पडू नये.
- शयनगृहात मंद दिवा असावा.
- शयनगृहात हळुवार तरल वाद्यसंगीत लावून ठेवा.
- शयनगृहात सुगंधी फुलं असावीत.

- शयनगृहातील कपाटाच्या आरशांना, ड्रेसिंग टेबलच्या आरशाला पडदा असावा.
- शयनगृहात कमीत-कमी वस्तू असाव्यात.
- शयनगृहात अवजड वस्तू असू नयेत.
- शयनगृहात अडगळ करू नये. स्वच्छता असावी.
- शयनगृहाच्या दाराला फटी असू नयेत.
- शयनगृहात उत्साहवर्धक पोस्टर्स, चित्रं असावीत. येथे धबधब्याचे वॉल पोस्टर्स लावू नयेत.
- शयनगृहात हिंस्र प्राण्यांची चित्रं, रडकी चित्रं, युद्धाची चित्रं, शोकग्रस्त चित्र लावू नयेत. यामुळे वैवाहिक सौख्यात सतत बाधा येते.
- शयनगृह घराच्या आग्नेय दिशेस असू नये.
- शयनगृहाला आग्नेय, तसेच दक्षिणेला दरवाजे असू नये.
- शयनगृहात नैऋत्य कोपरा मोकळा ठेवू नये. या कोपर्यात सिरॅमिक पॉट, रंगीत मोहक फोटो स्टँड, मोहक दिवे ठेवावेत.

- शयनगृहात शक्यतो तिजोरी असू नये आणि असल्यास उत्तर दिशा टाळावी.
- पाहुणे मंडळी, घरातील अन्य मंडळींसाठी पूर्वेकडे शयनगृह असावे.
- शयनगृहात केरसुणी (झाडू) ठेवू नये.
- शयनगृहात पलंग, दिवाण बिछाना बीमखाली असू नये.
- शयनगृहात झोपताना दक्षिणेकडे डोके आणि उत्तरेकडे पाय करावे.
- शयनगृहातील इलेक्ट्रिक उपकरणे आग्नेयेला असावीत.
- शयनगृहातील कपाट, शोकेस दक्षिणेला असावे.
- शयनगृहात संडास-बाथरूम पश्चिमेकडे असावे.
- शयनगृहाला खिडकी पूर्व-पश्चिम किंवा उत्तरेला असावी.
- शयनगृहातील खिडकीचा पडदा नाजूक नक्षीदार असावा.

- शयनगृह कधीही ईशान्येला असू नये, ईशान्येकडील शयनगृह आजारपण देते तर आग्नेयेकडील शयनगृह वैवाहिक जीवनात संघर्ष घडवते.
- शयनगृहाच्या खिडकीच्या पडद्यांना मंजूळ नाद देणारी घुंगरं असावीत. कामजीवनातील आनंद द्विगुणित होतो.
