आपले स्वयंपाकघर हा प्रत्येक गृहिणीचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. ज्याप्रमाणे आपल्या वास्तूमधील प्रत्येक खोली महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे आपले स्वयंपाकघर सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. स्वयंपाकघरात मुख्यत्वे अग्नी आणि पाणी यांची योग्य दिशेला मांडणी असणे आवश्यक आहे, स्वयंपाकघरासाठी असलेली नियमावली आपण पाहूयास्वयंपाकघर घराच्या आग्नेय कोपर्यात असावे. ते दक्षिणेला असू नये.
- स्वयंपाकघराला लागून स्वच्छतागृह असू नये. म्हणजेच स्वयंपाकघरासमोर संडासाचे दार असू नये.
- स्वयंपाकघराच्या भिंतींना लाल रंग देऊ नये.
- स्वयंपाकघरात पाण्याचे पिंप, माठ ईशान्येला असावे. पाणी पिण्याची भांडी, तांब्या, जग ईशान्य कोपर्यात ठेवण्यात यावे.
- स्वयंपाक घरात सुरी, विळी आग्नेय कोपर्यात असावी.
- स्वयंपाकघरात फ्रीज आग्नेय दिशेला असावा.
- स्वयंपाकघरात गॅस किंवा स्टोव्ह आग्नेय कोपर्यात असावे. मोठे घर असेल तर पाणी तापवण्याचा बंब आग्नेय कोपर्यात ठेवावा.

- स्वयंपाक करताना गृहिणीचे तोंड पूर्वेला राहील अशा तर्हेने स्वयंपाकाचा ओटा असावा. स्वयंपाकघरातील ओट्याची रचना एल टाईप असावी.
- स्वयंपाकघरात अन्न शिजवताना गृहिणीचे मन प्रसन्न असावे. कारण ज्या मनःस्थितीतून अन्न शिजवले जाते, ते अन्नामध्ये उतरते. घरातील व्यक्तींचे स्वास्थ्य त्या गृहिणीच्या हातात असते. म्हणून जेवण बनवताना सकारात्मक विचार मनात असावेत.

- स्वयंपाकघर वायव्य कोपर्यात असल्यास दुर्दैवी घटना घडतात. अपघात होतात. आर्थिक विवंचना वाढतात. स्वयंपाकघर उत्तरेस असल्यास दारिद्र्य योग संभवतो.
- स्वयंपाकघर नैऋत्येस असल्यास आयुष्य खडतर बनते. अपघात घडतात. स्वयंपाकघर ईशान्येस असल्यास मानसिक ताणतणाव वाढतात.
- स्वयंपाकघरात साठवणीचे डबे, मिसळण्याचा डबा इत्यादी दक्षिण अथवा पश्चिम कोपर्यात असावे.

- स्वयंपाकघरात वॉशबेसिन ईशान्येला असावे.
- स्वयंपाकघराच्या मुख्य दरवाज्यासमोर स्टोव्ह, गॅसची शेगडी असू नये. तसेच सुरी, विळी ठेवू नये.
- स्वयंपाकघराचे मुख्य प्रवेशद्वार मधोमध असावे. स्वयंपाकघरात भरपूर उजेड असावा.
- स्वयंपाकघरात कपबशा, क्रॉकरी, काचेचे ग्लास फुटक्या अवस्थेत असू नयेत.
- स्वयंपाकघरात नासके, खूप शिळे अन्न, बुरशी आलेले अन्न, कचरा असू नये.
- स्वयंपाकघरात पूर्व-पश्चिम भागात एखादी खिडकी असावी, हवा खेळती राहावी.
- स्वयंपाकघराला काळा, पांढरा रंग असू नये. तर पिवळा, गुलाबी रंग असावा.
- स्वयंपाकघराची वेळोवेळी साफसफाई करावी. धूळ, जळमटे असू नयेत. स्वच्छ व आकर्षक स्वयंपाकघर सर्वांना आकर्षित करते. अशा वास्तूत ‘अन्नपूर्णा’ देखील प्रसन्न राहते.
