कटकी कैरी लोणचे
साहित्यः 1 किलो कैर्या, दीड किलो साखर, 4 चमचे तिखट, 4 चमचे मीठ, 1 चमचा जिरेपूड.
कृतीः कैरीची साल काढून लहान लहान फोडी कराव्यात. ह्या फोडींना मीठ चोळून दुसर्या दिवशी त्यांचे पाणी काढून टाकावे. जितक्या फोडी होतील तितकीच साखर त्यात मिसळावी. स्टीलच्या पातेल्यात हे मिश्रण घालून पातेल्याचे तोंड कापडाने बांधून उन्हात ठेवावे. रात्री घरात आणल्यावर हे मिश्रण चमच्याने ढवळावे. आवडीनुसार दाट झाल्यावर छुंद्याप्रमाणेच तिखट, मीठ, जिरेपूड घालून पुन्हा एक दिवस उन्हात ठेवून मग हे मिश्रण बरणीत भरून ठेवावे. वर्षभर छान टिकते.
उकड आंबा
साहित्यः 1 डझन रायवळ आंबे, 1 वाटी मोहरीची डाळ, पाव किलो गूळ, 4 चमचे तिखट, 2 चमचे मेथीची पूड, 1 चमचा हिंग, चवीप्रमाणे मीठ.
कृतीः पातेल्यात पाणी घालून वरती चाळणी ठेवून आंबे चांगले वाफवून घ्यावेत. गुळाचा पाक करावा. मोहरी चांगली बारीक वाटावी व ह्या गुळाच्या पाकात घालावी. तसेच तिखट, मीठ, हिंग. मेथी पूडही घालावी. हे मिश्रण चांगले ढवळावे. आता उकडलेला आंबा डेखापाशी थोडा फोडावा, साले जराशी दूर करावी व गुळाच्या मिश्रणात हे आंबे घालावे. ह्या मिश्रणात हे आंबे चांगले बुडाले पाहिजेत. मग हे मिश्रण बरणीत भरून ठेवावे. जरूर असेल तेव्हा एक, एक आंबा काढावा व सोलून, कुस्करून त्यावर फोडणी द्यावी.