Close

रंग माझा वेगळा : सव्वा लाख सुनांची सासू… कोण होत्या त्या? असं काय केलं त्यांनी? (Mother-In-Law Of 1.25 Lakh Daughter-In-Laws : Who Is She? What Did She Achieve?)

आज १६ सप्टेंबर. पाकशास्त्रात अद्वितीय कामगिरी केलेल्या एका जगावेगळ्या कर्तबगार महिलेचा जन्मदिन! त्या आहेत ‘रुचिरा’ या अतिशय गाजलेल्या, पाककृतीवरील पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई ओगले!

कमलाबाईंनी लिहिलेले हे पुस्तक १९७० साली प्रकाशित झाले. मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेल्या या मराठी पुस्तकाच्या ३० वर्षात २ लाखांहून अधिक प्रती खपल्या आहेत. लक्षावधी प्रती खपलेलं हे एकमेव मराठी पुस्तक आहे. ‘रुचिरा’च्या सव्वा लाख प्रती जेव्हा विकल्या गेल्या होत्या, तेव्हा लेखिका कमलाबाई ओगले यांना ‘सव्वा लाख सुनांची सासू’ हे बिरुद चिकटलं, ते आजतागायत कायम आहे. कारण प्रकाशित झाल्यापासून हे पुस्तक नवविवाहित तरुणींचे दीपस्तंभ ठरले. सोप्या भाषेत लिहिलेल्या, दररोज करू शकणाऱ्या पाककृती शिकण्याबाबत त्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरले. लग्नात हे पुस्तक नववधूला भेट देण्याची प्रथा त्या काळी पडली होती. हे पुस्तक वाचून अनेक गृहिणी पाककलेत सुगरण झाल्याची उदाहरणे आहेत.

विक्रमी खपाचा उच्चांक गाठणारे एक पाककलेचे पुस्तक लिहिणाऱ्या कमलाबाई ओगले यांचे जीवनचरित्र विलक्षण आहे. दांडेकर कुटुंबात त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ साली झाला. खेडेगावात जन्मलेल्या कमलाबाईंनी इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेतले. नंतर लग्न होऊन त्या सांगली शहरात ओगले यांच्या घरात आल्या, तेव्हा स्वयंपाकात त्या पारंगत नव्हत्या. आपल्या सासूबाईंकडून त्यांनी विविध पाककृती शिकून घेतल्या.

पुढे यजमानांची बदली झाल्याने त्या मुंबईत आल्या. इथे विविध पाककला स्पर्धेत भाग घेऊ लागल्या. उत्कृष्ट पाककृती व त्याची सजावट यासाठी त्यांना नेहमीच प्रथम पारितोषिक मिळत गेले. त्या एस. एन. डी. टी. या महिलांच्या विद्यापीठात पाककला मार्गदर्शक राहिल्या. पुढे त्यांनी पाककलेचे वर्ग सुरू करून कित्येक महिलांना पाककला शिकविल्या. अन्‌ ‘रुचिरा’ हे पुस्तक लिहून विक्रम केला.

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील साहित्याची मापे ग्रॅम, मिलिग्रॅम अशी आजच्या प्रथेसारखी नसून, चमचा, वाटी ही मापे आहेत.

Share this article