गाजराची खीर
साहित्य : पाव किलो गाजर, 50 ग्रॅम खजूर, पाऊण वाटी साखर, 1 चमचा तूप, 2 वाटी दूध, स्वादानुसार वेलची पूड.
कृती : गाजर किसून घ्या. जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून त्यात गाजराचा कीस चांगला परतवून घ्या. गाजराचा कीस मऊ शिजल्यानंतर त्यात साखर घाला. साखर घातल्यावर गाजराला पाणी सुटेल. हे पाणी पूर्णतः आटेपर्यंत कीस व्यवस्थित शिजवून घ्या. कीस शिजल्यानंतर त्यात खजुराचे तुकडे आणि वेलची पूड घालून एकत्र करा.
टीप :
लाल गाजरांचा वापर करा. ती मुळातच गोड असतात, त्यामुळे खीर अधिक चविष्ट होते. गाजराची खीर पातळ करायची असल्यास, त्यात दूधही घालता येते.
खीर बनविताना...
खीर थंड झाल्यावर खूप घट्ट होते. अशा घट्ट झालेल्या खिरीमध्ये दूध घालून ती पातळ करता येते.
खीर थंड झाल्यावर घट्ट होऊ नये यासाठी, खिरीमध्ये साखर अशीच घालण्याऐवजी साखरेचा पाक तयार करून तो घाला. यामुळे दूधही
कमी लागेल आणि थंड झाल्यावरही खीर घट्ट होणार नाही.
वेलची पूड तयार करण्यासाठी, सबंध वेलची मंद आचेवर थोडीशी परतवून (केवळ नरम राहू नये म्हणून) थोड्या साखरेसोबत मिक्सरमधून बारीक करून घ्या. यामुळे वेलचीची सालेही वाया जाणार नाहीत आणि चव छान येईल.
कोणत्याही भाजीची खीर करायची असल्यास, सर्वप्रथम ती भाजी तुपावर परतवून घ्या. नंतर ती पूर्णतः शिजवून घेतल्यानंतरच त्यात दूध व साखर एकत्र करा. भाजी शिजण्यापूर्वीच त्यास साखर एकत्र केल्यास भाजी योग्य प्रकारे शिजत नाही.
Link Copied