चिली पोटॅटोज
साहित्य : 3 बटाटे, अर्धा कप मैदा, अर्धा कप कॉर्नफ्लोअर, आवश्यकतेनुसार तेल, 2 टीस्पून बारीक चिरलेली लसूण, आल्याचा एक मोठा तुकडा बारीक चिरलेला, 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 2 टीस्पून सोया सॉस, 1 टीस्पून व्हिनेगर, पाव टीस्पून काळी मिरी पूड, स्वादानुसार मीठ, 1-2 कांद्याच्या हिरव्या पाती बारीक चिरलेल्या.
कृती : बटाटे तासून, त्याचे पातळ लांबट तुकडे करून घ्या. बटाट्याच्या या फोडी स्वच्छ धुऊन कोरड्या करून घ्या. एका वाडग्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर (2 टीस्पून बाजूला काढून ठेवा) आणि आवश्यकतेनुसार पाणी मिसळून पातळ घोळ तयार करा. कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. आता बटाट्याची एक-एक फोड मैद्याच्या मिश्रणात घोळवून गरम तेलात सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे सर्व बटाट्याच्या फोडी तळून घ्या.
आता एका कढईमध्ये 2 टीस्पून तेल गरम करून त्यात लसूण, हिरवी मिरची आणि आलं घालून परतवून घ्या. नंतर त्यात सोया सॉस, व्हिनेगर, मीठ आणि अर्धा कप पाणी मिसळून मिश्रणाला उकळी येईपर्यंत शिजवा. एका वाटीत 2 टीस्पून कॉर्नफ्लोअरमध्ये थोडं पाणी मिसळून एकजीव करा. कढईतील मिश्रणाला उकळी आली की, त्यात कॉर्नफ्लोअरचं मिश्रण मिसळा. मिश्रण सतत ढवळत राहा. मिश्रण दाट झालं की, आचेवरून खाली उतरवा. त्यात तळलेल्या बटाट्याच्या फोडी घालून चांगलं एकजीव करा. त्यावर कांद्याच्या हिरव्या पाती घालून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.