Close

करवंदाचे लोणचे व कोथिंबिरीचे लोणचे (Karwandache Lonche And Pickled Coriander)

करवंदाचे लोणचे
साहित्यः अर्धा किलो पिकलेली करवंदे, 1 चमचा तिखट, 1 चमचा मेथी, प्रत्येकी अर्धा चमचा हिंग, हळद, अर्धी वाटी गूळ, अर्धी वाटी तेल, चवीनुसार मीठ.
कृतीः करवंदे धुऊन, पुसून त्यांचा चीक काढून टाकावा. तसेच आतील बियाही पूर्ण काढाव्यात. त्यांना तिखट, हळद लावावी. तेल तापवून त्यात हिंग, मेथी घालावी. जरा परतल्यावर बिया काढलेली करवंदे घालावीत. ती शिजल्यावर त्यात गूळ, मीठ घालून एक वाफ काढावी. हे लोणचे गार झाल्यावर बरणीत भरावे.

कोथिंबिरीचे लोणचे
साहित्यः 3 वाट्या निवडलेली कोथिंबीर, 4 ओल्या मिरच्या, आल्याचे पातळ काप, 4 खारका, 2 लिंबे, 2 चमचे चिरलेला गूळ,
पाव चमचा मेथी, 1 चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, पाव वाटी तेल, चवीनुसार मीठ.
कृतीः कोथिंबीर धुऊन सावलीत सुकवावी व बारीक चिरावी. खारकांचे डेख व बी काढून बारीक तुकडे करावेत व ते चांगले वाफवून शिजवून घ्यावेत. जाड बुडाच्या पातेल्यात तेल घालून त्यात मेथी, मोहरी, हिंगाची फोडणी करावी. त्यात कोथिंबीर परतावी. दोन मिनिटांनी त्यात आल्याचे तुकडे, खारकांचे तुकडे, गूळ, मीठ घालावे. मिरच्या वाटून घालाव्यात. हे सर्व एकत्र करून कोथिंबिरीसोबत चांगली वाफ काढावी. गार झाल्यावर लिंबू पिळून बरणीत भरावे.

Share this article