लिंबाचे तिखट लोणचे
साहित्यः 50 रसरशीत लिंबे, 350 ग्रॅम लाल मिरच्या, 125 ग्रॅम हळद, 200 ग्रॅम मेथी, 20 ग्रॅम हिंग, 100 ग्रॅम आले, 100 ग्रॅम हिरव्या मिरच्या, 100 ग्रॅम आंबेहळद, 500 ग्रॅम मीठ.
कृतीः लाल मिरच्या, हिंग, हळद न भाजताच कुटावी. मेथ्या जरा भरडच कुटाव्यात. ह्या सर्वात मीठ घालावे.
लिंबे, आले, हिरव्या मिरच्या धुऊन, पुसून कोरड्या कराव्यात. लिंबांच्या साधारण 8 फोडी कराव्यात. 20 लिंबांचा रस काढावा. स्वच्छ धुतलेली कोरडी बरणी घ्यावी. मिरच्यांची डेखे काढावीत. आंबेहळद, आले ह्यांच्या आवडीनुसार चकत्या कापाव्यात. मिरच्यांचे तुकडे करावेत. एका परातीत वरील सर्व गोष्टी नीट मिसळाव्यात व बरणीत भरून ठेवावे. वरून लिंबाचा रस घालावा.
सालीचे लोणचे
साहित्यः 5 लिंबाच्या साली, अर्धी वाटी मीठ, 3 लिंबांचा रस, 1 चमचा हळद, 1 चमचा हिंग, 1 चमचा तिखट, 1 चमचा मेथी, 2 चमचे तेल, 2 चमचे साखर.
कृतीः लिंबाचा रस काढल्यावर, सुधारस वगैरे केल्यावर ज्या साली उरतात त्या साली घेऊन त्यांचे आवडीनुसार तुकडे करावेत. त्या तुकड्यांना तिखट, मीठ, हळद, हिंगपूड, साखर नीट चोळावी. तेलात मेथ्या तळून त्यांची पूड करून घालावी. लोणचे बरणीत भरून ही बरणी दोन दिवस उन्हात ठेवावी. नंतर त्यात लिंबाचा रस घालावा. हे लोणचे फारसे आंबट होत नाही.