मुळ्याचा पराठा
साहित्य : सारणासाठी : 4 मुळे, 4 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), 1 इंच आले (किसलेला), 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून ओवा, स्वादानुसार मीठ.
कणकेसाठी : 2 कप गव्हाचे पीठ, कोमट पाणी, थोडे साजूक तूप, स्वादानुसार मीठ.
इतर : बटर.
कृती : मुळे स्वच्छ धुऊन तासून घ्या. नंतर किसून, मळून त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या. मुळ्याच्या किसात सारणाचे उर्वरित सर्व साहित्य एकत्र करून एकजीव मिश्रण तयार करा. नेहमीप्रमाणे कणीक मळून घ्या. या कणकेच्या लिंबाएवढ्या गोळ्या तयार करून, चपात्या लाटून घ्या. एका चपातीवर मुळ्याचे मिश्रण व्यवस्थित पसरवून, त्यावर दुसरी चपाती ठेवा आणि पाण्याच्या साहाय्याने कडा बंद करून घ्या.
हा पराठा अलगद तव्यावर ठेवून मध्यम आचेवर दोन्ही बाजूने बटर लावून खमंग भाजून घ्या. मुळ्याचा गरमागरम पराठा दही व लोणच्यासोबत सर्व्ह करा.