Close

तापसी पन्नू प्रियकर मॅथियास बोईसोबत लग्न बंधनात अडकली (Taapsee Pannu Marries Boyfriend Mathias Boe In Udaipur)

मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने नुकतेच तिचा प्रियकर मॅथियास बोईसोबत उदयपूरमध्ये लग्न केले असल्याचे समजते.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने कुणालाही सुगावा लागू न देता लग्न उरकल्याचे समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने नुकतेच तिचा प्रियकर मॅथियास बोईसोबत उदयपूरमध्ये लग्न केले आहे. त्यांचा हा विवाह सोहळा शनिवारी २३ मार्च रोजी पार पडला आहे. या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त जवळच्या मित्रांनाही आमंत्रित करण्यात आले होते, ज्यात अनुराग कश्यप आणि पावेल गुलाटी यांचा समावेश होता. मीडिया रिपोर्टनुसार, हे लग्न उदयपूरमध्ये पार पडले आहे.

या लग्न सोहळ्यात सगळ्याच गोष्टी खूप खाजगी ठेवण्यात आल्या होत्या. २० मार्चपासून सुरू झालेल्या या लग्न सोहळ्यात प्री-वेडिंग समारंभही पार पडला. या जोडीला त्यांच्या लग्नाच्या दिवशी कोणतेही मोठे मीडिया कव्हरेज किंवा झगमगाट नको होता, म्हणून त्यांनी हा दिवस अतिशय खाजगी आणि खास लोकांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

तापसी पन्नूच्या या लग्न सोहळ्यात बॉलिवूडचे सेलिब्रिटी सामील झाले नव्हते. मात्र, काही मोजक्या लोकांना आमंत्रण देण्यात आल्याचे समोर आले आहे. तापसीने तिच्या लग्नात दिग्दर्शक आणि जवळचा मित्र अनुराग कश्यपला आमंत्रित केले होते. याशिवाय 'थप्पड'मधला तिचा को-स्टार पावेल गुलाटीही या पाहुण्यांच्या यादीमध्ये सामील होता. अनुराग कश्यप आणि तापसी खूप जवळचे मित्र आहेत. या दोघांनी 'मनमर्जियां', 'दोबारा' आणि 'सांड की आँख' सारखे चित्रपट एकत्र केले आहेत. या लग्नात कनिका ढिल्लन आणि तिचा पती हिमांशू शर्मा देखील उपस्थित होते.

अभिनेता पावेल गुलाटी याने सोशल मीडियावर लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता अभिलाष थपियाल देखील दिसत आहेत. असे म्हटले जात आहे की, लग्नानंतर तापसी लवकरच तिच्या इंडस्ट्रीतील मित्रांसाठी मुंबईत पार्टी देणार आहे. लग्नाच्या रिसेप्शन पार्टीची तारीख ती लवकरच जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे. तापसीच्या लग्नाची झलक शेअर करताना पावेल गुलाटीने सोशल मीडियावर लिहिले, ‘ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, आम्हाला माहित नाही...आम्ही कुठे आहोत.. ओळख पाहू!’

तापसी आणि मॅथियासने उदयपूरमध्ये शीख आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केल्याचे म्हटले जात आहे. कनिका ढिल्लनने तापसी पन्नूसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने पती हिमांशू शर्मासोबत लग्नाला हजेरी लावली होती. एक दिवसापूर्वी कनिकाने इंस्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती सुंदर ड्रेसमध्ये दिसली होती. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, 'माझ्या मैत्रिणीचे लग्न होत आहे'. तिचे हे फोटो उदयपूरचेच असल्याचे दिसत आहेत. तापसी आणि कनिकाने 'हसीन दिलरुबा', 'मनमर्जियां', 'डंकी' आणि 'फिर आयी हसीन दिलरुबा'मध्ये एकत्र काम केले आहे.

तापसी पन्नू आणि बॅडमिंटनपटू मॅथियास बोई गेल्या १० वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तापसी पन्नू आणि मथियास बोई यांची पहिली भेट २०१३ मध्ये इंडियन बॅडमिंटन लीगच्या उद्घाटन समारंभात झाली होती. काही आठवड्यांपूर्वीच तापसी लग्न करणार असल्याची बातमी समोर आली होती.

(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Share this article