Close

व्हेज स्प्रिंग रोल्स (Veg Spring Roll)


साहित्य : स्प्रिंग रोल रॅपरसाठी : 1 कप मैदा, 1 टेबलस्पून साबुदाणा पीठ (किंवा कॉर्न स्टार्च), 1 टीस्पून तेल, पाव टीस्पून मीठ, अर्धा कप आरारूट पावडर (किंवा कॉर्न स्टार्च).
सारणासाठी : पाऊण कप उभा पातळ चिरलेला कोबी, अर्धा कप उभे पातळ चिरलेले गाजर, पाव कप बारीक चिरलेला पातीचा कांदा, अर्धा कप पातळ तिरकी चिरलेली फरसबी, 1 मध्यम सिमला मिरची (पातळ उभे काप केलेली), अर्धा कप शिजलेल्या नूडल्स, 2 टीस्पून बारीक चिरलेली लसूण, 1 टीस्पून बारीक चिरलेले आले, 2 टीस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून तेल, पाव टीस्पून मिरपूड, तळण्यासाठी तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : स्प्रिंग रोल रॅपरसाठी : मैदा, साबुदाणा पीठ, तेल व मीठ एकत्र करून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मध्यमसर पीठ भिजवा. हे पीठ एक तास झाकून ठेवा. मळलेल्या पिठाचे 18-20 लहान गोळे करा. त्याच्या आरारूट पावडरवर एकदम पातळ पोळ्या लाटा. तवा अगदी मंद आचेवर तापवा. तव्यावर या पोळ्या अगदी कच्च्या भाजा (प्रत्येक बाजूने 5 सेकंद).
जास्त भाजली गेली तर रोल वळता येणार नाही. तयार रॅपर्स प्लेटमध्ये ठेवून त्यावर टॉवेल ठेवा. अशा प्रकारे सर्व रॅपर्स कच्चे भाजून घ्या. रॅपर्स त्याच दिवशी वापरा. फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील ओलसरपणा कमी होतो आणि तुकडे पडतात.
सारणासाठी : कढईत 1 टेबलस्पून तेल गरम करून त्यात आले-लसूण परतावा. त्यात फरसबी, पातीचा कांदा, गाजर
व सिमला मिरची घालून साधारण 30 सेकंद मोठ्या आचेवर परतावा. सोया सॉस घालून चांगले एकत्र करा. नंतर मीठ, मिरपूड व कोबी घालून 30 सेकंद परतवा. आच बंद करून नूडल्स घालून एकत्र करा.
एक स्प्रिंग रोल रॅपर घेऊन त्याच्या एका बाजूला 1 चमचा सारण ठेवा. आवरण दोन वेळा रोल केल्यानंतर त्याची डावी व उजवी बाजू आतल्या बाजूने दुमडा आणि नंतर पुढे रोल करत न्या. शेवटी पाण्याने किंवा मैदा व पाण्याच्या पेस्टने कडा चिकटवा. अशा प्रकारे सर्व स्प्रिंग रोल तयार करा. तेल गरम करून त्यात हे रोल्स मध्यम आचेवर तळा. गरमागरम स्प्रिंग रोल्स चिली सॉससोबत सर्व्ह करा.

Share this article