गव्हल्यांची खीर
साहित्य : 1 वाटी गव्हले, 4 वाटी दूध, 1 वाटी साखर, स्वादानुसार वेलची पूड, 1 चमचा साजूक तूप.
कृती : जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात गव्हले घाला आणि मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या. नंतर त्यात उकळलेले दूध घालून एकत्र करा. दूध साधारण अर्धे झाले की, गव्हले शिजले आहेत का ते पाहा. गव्हले शिजल्यावर त्यात साखर घालून एकत्र करा. साखर विरघळून खिरीला एक उकळी आली की आच बंद करा. नंतर त्यात वेलची पूड घाला. गव्हल्यांची खीर गरम किंवा थंड कशीही स्वादिष्ट लागते.
गव्हले बनविण्यासाठी : 1 वाटी गव्हाचे पीठ घेऊन त्यात अगदी थोडे मीठ आणि आवश्यकतेनुसार दूध घालून घट्टसर पीठ मळून घ्या. हे पीठ 2 तासांकरिता तसेच झाकून ठेवून द्या. नंतर त्याचे गव्हले वळायला घ्या. गव्हले वळताना दुधाचा हात घेऊन पीठ मळून घ्या. या पिठाचे लहान-लहान गोळे करून त्याची एक पातळ सुरनळी, अर्थात शेवई बनवा. अंगठा आणि अंगठ्या जवळचे बोट, या दोन बोटांत थोडासा दाब देऊन हा गव्हला करतात. वळलेल्या सुरनळीचे लहान तुकडे पाडा. तुकडे पाडतानाही ते वळून घ्या. हे गव्हले साधारण तांदळाप्रमाणे दिसतात. गव्हले वळून झाल्यावर वाळवून घ्या. यासाठी उन्हाची गरज लागत नाही. ताटात ठेवून घरातच 2 दिवस सुकविले तरी चालतात. जास्त असल्यास घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.