करण जोहर निर्मित-दिग्दर्शित 'कभी खुशी कभी गम' सिनेमानं २००१ साली बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हा फॅमिली ड्रामा पाहण्यासाठी थिएटरमध्ये तुफान गर्दी होत होती. अमिताभ बच्चन, जया बच्चन, काजोल, शाहरुख खान, हृतिक रोशन, करिना कपूर, रानी मुखर्जी अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात होती तेव्हा हे तर घडणारंच होतं.
सिनेमाची कथा, गाणी अन् सगळा डामडौल पाहून त्यावेळी प्रेक्षक भारावून गेले होते. शाहरुखनं साकारलेला राहूल, काजोलनं साकारलेली अंजली, हृतिक रोशननं साकारलेला रोहन अन् करिनानं साकारलेली पूजा उर्फ पू ..एकंदरीत रायचंद फॅमिली भाव खाऊन गेली होती. आता अनेक वर्षांनी या सिनेमाबाबतीत मोठा खुलासा झाला आहे.
काजोल करणची बेस्ट फ्रेंड असूनही ती या सिनेमात अंजलीसाठी पहिली पसंती नव्हती. करणच्या मनात दुसरीच अभिनेत्री होती. पण कुठे माशी शिंकली कोण जाणे… अन् सिनेमा शेवटी काजोलच्याच पदरात पडला. करण जोहरनं आपल्या सिनेमात नेहमीच काजोलला संधी दिली अन् तिनंही त्याचं सोनं केलं. करणच्या 'कभी खुशी कभी गम' सिनेमातही काजोलनं फनी आणि समंजस अंजली साकारत धमाल उडवून दिली होती. पण करणला ही भूमिका काजोलला द्यायची नव्हती..त्याच्या मनात होती ऐश्वर्या राय..त्यानं ऐश्वर्यासोबत मीटिंगही ठरवली होती.
आता करणला ऐश्वर्या सिनेमात हवी, कारण त्याला वाटलं काजोल सिनेमाला नकार देईल, तिचं लग्न झालंय, तिला आता कुटुंब सुरू करायचं आहे हे त्याला माहित होतं. म्हणून त्यानं तिला विचारणं टाळलं अन थेट ऐश्वर्याकडे सिनेमा नेला. पण म्हणतात ना जिसके किस्मत में जो लिखा है वो हो के रहता है...अगदी तसंच काहीसं झालं...
ऐश्वर्याला भेटायच्या एक दिवस आधी करण सहज काजोलला भेटला अन् त्यानं 'कभी खुशी कभी गम' सिनेमाविषयी तिच्याकडं विषय काढला. तेवढ्यात काजोलनं थेट विचारलं,'माझी भूमिका काय आहे? मीच करतेय हा तुझा सिनेमा..'
हे ऐकून करणची पंचाईत झाली. कारण त्यानं ऐश्वर्याला घ्यायचं ठरवलं होतं. त्याला वाटलं होतं काजोल नकार देईल..उत्साह दाखवणार नाही पण झालं उलटंच. शेवटी काजोल इन झाली अन् ऐश्वर्या आऊट..याविषयी एकदा ऐश्वर्यानं देखील एका कार्यक्रमात सांगितले होते.