मखाना शेंगदाणा कढी
साहित्य : अर्धा वाटी मखाने, पाव वाटी शेंगदाणे, 2 टेबलस्पून काजू, पाव वाटी राजगिर्याचं पीठ, अर्धा वाटी दही.
फोडणीसाठी : 2 टीस्पून तूप, अर्धा टीस्पून जिरं, 1 काडी दालचिनी, 2 लवंगा.
ग्रेव्हीसाठी : 1 वाटी ओल्या नारळाचा चव, 4 हिरव्या मिरच्या, 1 लहान तुकडा आलं, 2 वेलच्या, थोडी कोथिंबीर, काही सुक्या गुलाबाच्या पाकळ्या, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार साखर.
कृती : काचेच्या बाऊलमध्ये राजगीरा पीठ आणि दही हँड ब्लेंडरने एकजीव करा. ग्रेव्हीसाठीचं सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. आचेवर पॅनमध्ये तूप घालून त्यात मखाने, शेंगदाणे व काजू परतून बाजूला काढून ठेवा. त्याच पॅनमध्ये तुपावर जिरं, दालचिनी व लवंगाची फोडणी करा. त्यात ग्रेव्हीचं वाटण घाला आणि चांगलं परतून घ्या. नंतर त्यात मखाने, शेंगदाणे व काजू घालून व्यवस्थित ढवळा. आता त्यात राजगीरा पीठ आणि दह्याचं मिश्रण घाला. मिश्रण सतत ढवळत राहा. आपल्या आवडीप्रमाणे पाणी घालून कढी पातळ करा. त्यात अंदाजे मीठ आणि साखर घाला. कढी चांगली उकळली की, आच बंद करा. सर्व्हिंग बाऊलमध्ये कढी काढून त्यावर कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा.