हळदीच्या पानातील नारळीभात
साहित्य : 1 वाटी जुना बासमती तांदूळ, 1 वाटी ओला नारळाचा चव, आवश्यकतेनुसार तूप, स्वादानुसार साखर, 2-3 लाल मिरच्या, अर्धा टीस्पून जिरं, पाव टीस्पून हिंग,
8-10 कडिपत्त्याची पानं, अर्धा टीस्पून चणा डाळ, अर्धा टीस्पून उडीद डाळ, स्वादानुसार मीठ, 2 केशरकाड्या, काही हळदीची पानं, लिंबाची फोड, सजावटीसाठी काजू आणि बेदाणे.
कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धा तास भिजत ठेवा. पातेल्यामध्ये तूप गरम करत ठेवा. त्यात गरम पाणी आणि मीठ घाला. पाणी उकळल्यावर त्यात तांदूळ घाला आणि 80 टक्के शिजवा. भात आचेवरून उतरवून ताटामध्ये पसरवून ठेवा.
आता दुसर्या पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात जिरं, हिंग, कडिपत्ता, चणा डाळ, उडीद डाळ यांची खमंग फोडणी करा. त्यात नारळाचा चव, साखर आणि भात एकत्र करा. त्यात दुधात मिसळलेलं केशर घालून झाकण ठेवा आणि 5 मिनिटं वाफ आणा. आता कुकरमध्ये पाणी उकळून एका डब्यात हळदीची पानं लावा आणि त्यावर हा भात घाला. 5 मिनिटं शिटी न लावता भात वाफवा. सर्व्हिंग प्लेटमध्ये ताजी हळदीची पानं मांडून, त्यावर हा भात वाढा. वरून लिंबूरस घाला. काजू-बेदाणे व कोथिंबीरने सजवा.