रस रोटी
साहित्य : 4 वाट्या कणीक, स्वादानुसार साखर, 1 नारळ, अर्धी वाटी चिरलेला गूळ, 8-10 वेलदोडे, तळण्याकरिता तूप, पाव वाटी तेल, चवीनुसार मीठ.
कृती : नारळ खोवून, मिक्सरमधून वाटून घ्या. गाळून त्याचे दूध बाजूला काढून ठेवा. हे पहिले दूध घट्ट निघते. नंतर उर्वरित खोबर्यामध्ये पुन्हा दूध किंवा पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या. याचे पातळ दूध निघेल, असे खोबरे अगदी सुके होईपर्यंत करा. जमा झालेले नारळाचे पातळ दूध एकत्र करून गाळून घ्या. त्यात स्वादानुसार साखर एकत्र करा.
कणकेमध्ये मीठ व तेल एकत्र करून घट्टसर पीठ भिजवून घ्या. पिठाच्या पातळ लहान पोळ्या लाटून घ्या. सर्वप्रथम त्या तव्यावर आणि नंतर विस्तवावर भाजून घ्या. या पोळ्या प्रथम पातळ रसामध्ये घाला, म्हणजे नारळाचे दूध शोषून घेतील. अशा प्रकारे सर्व पोळ्या नारळाच्या पातळ दुधात भिजत ठेवा. सर्व्ह करताना मात्र, पातळ दुधातील पोळ्या काढून वाटीत ठेवा आणि त्यावर नारळाचे घट्ट दूध ओता.